K Lalremruata Death : धक्कादायक! फलंदाजी आटोपून पॅव्हेलियनला जाताना भारतीय क्रिकेटपटूचा अचानक मृत्यू

K Lalremruata dies of heart attack on field : भारतीय क्रिकेट क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. मिझोरमचे माजी रणजी क्रिकेटपटू के. लालरेमरूआटा यांचे गुरुवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान निधन झाले. फलंदाजी आटोपून पॅव्हेलियनकडे परतत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि मैदानावरच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मिझोरमसह संपूर्ण भारतीय क्रिकेट वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
३८ वर्षीय लालरेमरूआटा हे एका स्थानिक स्पर्धेत ‘वेंगनुआई रेडर्स क्रिकेट क्लब’कडून खेळत होते. सामन्यात आपली फलंदाजी पूर्ण केल्यानंतर ते मैदानाबाहेर जात असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिझोरम क्रिकेटचे होते आधारस्तंभ –
Deeply saddened by the passing of Mizoram cricketer K Lalremruata.
He proudly represented Mizoram in the Ranji Trophy and Syed Mushtaq Ali Trophy.
The BCCI extends heartfelt condolences, thoughts and prayers to his family, friends and the Mizoram cricket community 🙏
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 9, 2026
के. लालरेमरूआटा हे मिझोरमच्या क्रिकेटमधील एक अनुभवी आणि आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे:
- रणजी ट्रॉफी:दोन हंगामात मिझोरमचे प्रतिनिधित्व.
- सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: ७ टी-२० सामन्यांत सहभाग.
- स्थानिक प्रभाव: निवृत्तीनंतरही क्लब क्रिकेटच्या माध्यमातून ते तरुण खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत असत.
क्रीडा जगतातून व्यक्त झाला शोक –
के. लालरेमरूआटा यांच्या निधनानंतर मिझोरम क्रिकेट संघटना (MCA) आणि बीसीसीआय (BCCI) डोमेस्टिकने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संघटनेने म्हटले की, “लालरेमरूआटा यांचे जाणे मिझोरम क्रिकेटची कधीही भरून न निघणारी हानी आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.”
हेही वाचा – Tilak Varma Injury : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून अचानक पडला बाहेर
मिझोरमचे क्रीडा आणि युवक सेवा मंत्री लालघिंगलोवा हमार यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली. “खेळत असताना अशा प्रकारे एखाद्या खेळाडूला गमावणे अत्यंत वेदनादायक आहे. श्वास घेण्यास त्रास झाल्याने ते कोसळले आणि ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सोसण्याची शक्ती मिळो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.





