Rinku Singh Priya Saroj Marriage date confirm : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि ‘फिनिशर’ रिंकू सिंग (Rinku Singh) लवकरच आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. रिंकू सिंग आणि मछली शहरच्या समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Priya Saroj) यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. रिंकूच्या कुटुंबीयांनी अधिकृतपणे लग्नाच्या मुहूर्ताबाबत खुलासा केला आहे. केव्हा होणार शुभमंगल? यापूर्वी हे लग्न नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होईल अशी चर्चा होती. मात्र, संसदेचे अधिवेशन आणि रिंकूचे क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक यामुळे तारीख ठरत नव्हती. आता रिंकूच्या कुटुंबाने स्पष्ट केले आहे की, टी-२० वर्ल्ड कप संपल्यानंतरच हे लग्न पार पडेल. वर्ल्ड कप फेब्रुवारीमध्ये सुरू होऊन मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे, त्यामुळे एप्रिल २०२६ मध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. भावाचा खुलासा आणि जर्सी नंबर ३५ चं गुपित – रिंकूचा मोठा भाऊ सोनू लेफ्टी याने लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लग्नासोबतच त्याने रिंकूच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. रिंकूच्या अलीगड या मूळ गावी एक नवी क्रिकेट अकादमी सुरू करण्यात येत आहे. या अकादमीला रिंकूच्या भारतीय संघातील जर्सी क्रमांकावरून म्हणजेच ‘अकॅडमी ३५’ असे नाव देण्यात येणार आहे. हेही वाचा – Tilak Varma Injury : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून अचानक पडला बाहेर अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत झाला होता साखरपुडा – रिंकू आणि प्रिया यांचा साखरपुडा ८ जून २०२५ रोजी लखनऊमधील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडला होता. या समारंभाला राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांनी या सोहळ्याला हजेरी लावून जोडप्याला आशीर्वाद दिले होते. या हाय-प्रोफाईल सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.