Vinod Kambli Video : ‘येथे खूप प्रेम मिळतंय…’, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी ठाण्यातील वृद्धाश्रमात? VIDEO होतोय व्हायरल
Vinod Kambli Video : भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आता ठाण्यातील एका वृद्धाश्रमात दिसले आहेत. तिथला कांबळी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vinod Kambli Video From Thane Elderly Care Center Health Update Memories With Sachin : भारतीय क्रिकेट संघाचे माजी धडाकेबाज फलंदाज आणि सचिन तेंडुलकरचे बालपणीचे मित्र विनोद कांबळी (Vinod Kambli) ठाण्यातील एका वृद्धाश्रम व केअर सेंटरमध्ये (Elderly Care Center) दिसून आल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कांबळी यांनी या केअर सेंटरमधून एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. कांबळी तेथे कायमस्वरूपी राहण्यासाठी दाखल झाले आहेत की केवळ उपचारासाठी गेले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र ५४ वर्षीय या दिग्गज खेळाडूचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर क्रीडाप्रेमी त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
‘येथे घरासारखं वाटतंय’; कांबळींनी मानले कर्मचाऱ्यांचे आभार!
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी केअर सेंटरमधील व्यवस्था आणि स्वच्छतेचे कौतुक करताना दिसत आहेत. “येथील सुविधा ‘फर्स्ट क्लास’ आहेत. लोकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळतोय. त्यामुळे मला घरापासून दूर असल्यासारखे अजिबात वाटत नाही,” असे सकारात्मक उद्गार कांबळी यांनी काढले. परिस्थितीशी झगडणाऱ्या कांबळींच्या चेहऱ्यावरील हा दिलासा चाहत्यांना सुखावणारा ठरला तरी, भारताचा माजी स्टार खेळाडू अशा अवस्थेत पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
मेंदूतील रक्ताची गाठ आणि विस्मरण; आरोग्याच्या गंभीर समस्यांशी लढा!
Vinod Kambli’s latest video, he is presently at an elderly care centre in Thane.
Praying for his recovery soon. pic.twitter.com/6k1plg1aCl
— Abhishek ✨ (@ImAbhishek7_) September 25, 2026
गेल्या काही वर्षांपासून कांबळी गंभीर आजारपणाशी लढा देत आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये रक्तदाब खालावल्याने आणि मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माजी प्रथम श्रेणी पंच मार्कस कौटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या स्ट्रोकमुळे कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ (Blood Clot) तयार झाली आहे, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती क्षीण झाली असून त्यांना गोष्टी विसरण्याचा त्रास होत आहे. मात्र, व्यसनाच्या अफवा त्यांच्या पत्नी अँड्रिया हेविट यांनी यापूर्वीच फेटाळून लावल्या होत्या.
सचिनसोबत ६६४ धावांची ऐतिहासिक भागीदारी; गाजवली १७ कसोटी!
सचिन तेंदुलकर के बचपन के दोस्त विनोद कांबली आज वृद्धा आश्रम मे रह रहे है, उन्होंने ने भावुक कर देने वाला सन्देश दिया है….
कभी एक बड़े क्रिकेटर थे जो आज वृद्धा आश्रम मे रह रहे है…. ईश्वर की भी अजब लीला है 🙏🏻 pic.twitter.com/nhK6yiVaCl
— Adesh_26 (@SonOfBharat_88) September 26, 2026
विनोद कांबळी यांनी भारतासाठी १७ कसोटी सामन्यांत ५४.२० च्या सरासरीने १,०८४ धावा (४ शतके) आणि १०४ एकदिवसीय सामन्यांत २,४७७ धावा कुटल्या आहेत. १९८८ मध्ये शालेय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरसोबत रचलेली ६६४ धावांची अभेद्य भागीदारी जागतिक क्रिकेटमध्ये अजरामर ठरली होती. एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या या प्रतिभावान डावखुऱ्या फलंदाजाची सध्याची अवस्था पाहून चाहते त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.





