Hardik Pandya Injury : हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाची आशा पुन्हा धुळीस! IPL नंतर सलग चौथ्या मालिकेला मुकणार; नेमकं कारण काय?
Hardik Pandya Injury : हार्दिक पंड्या आयपीएल २०२६ दरम्यान पाठीचा त्रास झाल्यानंतर, मांडीच्या स्नायूंच्या ताणामुळे हार्दिक इंग्लंड दौऱ्यालाही मुकला होता.

Hardik Pandya Shin Bone Injury India A vs Australia A Series Comeback Delayed : टीम इंडियातील खेळाडूंच्या दुखापतींची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. जसप्रीत बुमराहने दुखापतीतून सावरून पुनरागमन केले असले तरी अष्टपैलू हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) डोकेदुखी मात्र कायम आहे. आयपीएल २०२६ संपल्यापासून मैदानाबाहेर असलेल्या हार्दिक पंड्याबाबत आता अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे. ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतूनही तो बाहेर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आयपीएलदरम्यान पाठदुखी; त्यानंतर क्वाड्रिसेप्सच्या समस्येने वाढवला त्रास!
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना हार्दिक सातत्याने पाठीच्या त्रासाने त्रस्त होता; ज्यामुळे त्याला चार सामन्यांना मुकावे लागले होते. यातून सावरण्यासाठी तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) दाखल झाला. मात्र, प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात त्याच्या पायाच्या स्नायूंवर (Quadriceps strain) ताण आला. या स्नायूंच्या ताणामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यातून पूर्णपणे माघार घ्यावी लागली होती.
आता उजव्या पायाच्या ‘शिन बोन’ला दुखापत; स्कॅननंतर सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला!
Hardik Pandya set to miss the India A series against Australia A. (TOI). pic.twitter.com/5mEUWuQBKv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 25, 2026
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती मिळाल्यानंतर, बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्धच्या संघात त्याचा समावेश ‘फिटनेसच्या अटीवर’ केला होता. मात्र, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्याच्या उंबरठ्यावर असतानाच आता त्याच्या उजव्या पायाच्या ‘शिन बोन’मध्ये (नडगीचे हाड) नवी समस्या उद्भवली आहे. स्कॅन अहवालानंतर डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून तो या मालिकेत खेळू शकणार नाही.
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी मोठा धक्का; सूर्यांश शेडगेला संधी मिळण्याची चर्चा!
आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी पूर्ण तंदुरुस्त होण्याचे हार्दिकचे नियोजन होते; परंतु या नव्या दुखापतीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. दरम्यान, निवड समिती आता इंडिया ‘ए’ संघात हार्दिक पंड्याच्या जागेवर मुंबईचा युवा अष्टपैलू सूर्यांश शेडगेला संधी देण्याचा विचार करत असल्याचे समजते.





