Andros Townsend Accident : थरारक अपघात! मैदानावरील अवाढव्य रोलर थेट फुटबॉलपटूच्या अंगावरून गेला; VIDEO होतोय व्हायरल
Andros Townsend Accident : अँड्रोस टाऊनसेंड (Andros Townsend) थायलंडमध्ये एका अत्यंत भीषण अपघातातून थोडक्यात बचावला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

England Footballer Andros Townsend Survives Heavy Pitch Roller Accident In Thai League : इंग्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि टोटेनहॅम हॉटस्परचा माजी विंगर अँड्रोस टाऊनसेंड (Andros Townsend) थायलंडमध्ये एका अत्यंत भीषण अपघातातून थोडक्यात बचावला आहे. थाई लीग १ मधील पीटी प्राचुआप आणि पट्टानी एफसी यांच्यातील सामन्यादरम्यान ही अंगावर काटा आणणारी घटना घडली. मध्यांतराच्या (Half-time) वेळी मैदानात सराव करत असताना खेळपट्टी सपाट करणारा महाकाय अवजड रोलर थेट टाऊनसेंडच्या अंगावरून गेला. सुदैवाने या थरारक अपघातात ३३ वर्षीय फुटबॉलपटूला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि तो सुखरूप वाचला.
हवेत बॅकहील मारताना घडली दुर्घटना; थेट अंगावर चढला रोलर!
मध्यांतराच्या ब्रेकदरम्यान टाऊनसेंड पीटी प्राचुआप संघातील आपल्या सहकाऱ्यांसोबत मैदानात वॉर्म-अप करत होता. इतर खेळाडू चेंडू पास करत असताना तो सरावाच्या ओघात थोडा बाजूला गेला. हवेत बॅकहील मारण्याच्या प्रयत्नात त्याचे लक्ष विचलित झाले आणि तो नकळतपणे मैदानाचा ग्राउंड स्टाफ चालवत असलेल्या जड रोलरच्या मार्गात आला. रोलरने आधी त्याच्या पायांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे तो मैदानावर कोसळला आणि रोलर त्याच्या शरीरावरून पुढे सरकू लागला.
कमरेजवळ येऊन थांबला रोलर; थोडक्यात वाचले प्राण!
Former England winger Andros Townsend suffered an unfortunate accident while warming up for PT Prachuap before their Thai League fixture with Pattani.
— Troll Football Media (@TrollFootball2) September 19, 2026
रोलर अंगावर चढताच चालकाने प्रसंगावधान राखले आणि रोलर टाऊनसेंडच्या थेट कमरेजवळ येऊन थांबला, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला. हे भयानक दृश्य पाहताच मैदानावर उपस्थित असलेले सहकारी खेळाडू आणि कर्मचारी प्रचंड हादरले व मदतीसाठी धावले. टाऊनसेंड स्वतः कसातरी रोलरखालून बाहेर पडला.
चमत्कारिक बचाव! अपघातानंतरही मैदानात उतरला टाऊनसेंड –
इंग्लंडसाठी १३ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या टाऊनसेंडला कोणतीही मोठी इजा झाली नाही, हा एक चमत्कारच मानला जात आहे. धक्कादायक म्हणजे, या दुर्घटनेनंतरही त्याने सामना सोडला नाही, तर भरपाई वेळेत (Stoppage time) तो पर्याय खेळाडू म्हणून मैदानात खेळण्यासाठीही उतरला. या लढतीत पीटी प्राचुआपने पट्टानी एफसीचा ३-० ने पराभव केला.





