पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक आणि बाणेर-बालेवाडी प्रभागातील प्रभावशाली नेते अमोल बालवडकर यांनी पक्षाची साथ सोडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या बालवडकर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले असून, प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. देवेंद्र फडणवीसांनी दिला होता शब्द अमोल बालवडकर हे २०१७ ते २०२२ या काळात बाणेर-बालेवाडी प्रभागातून भाजपचे नगरसेवक होते. त्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातूनही उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती, परंतु पक्षाने चंद्रकांत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. विधानसभा निवडणुकीत बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात छुपे युद्ध उघडले होते. देवेंद्र फडणवीस यांनी बालवडकर यांना माघार घेण्यासाठी शब्द दिला होता आणि पुढील काळात न्याय देऊ असे आश्वासन दिले होते. पक्षाने शेवटच्या क्षणांपर्यंत झुलवले मात्र, महापालिका निवडणुकीत ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारल्याने बालवडकर यांनी “दगा फटका” असा गंभीर आरोप करत पक्ष सोडला. बालवडकर म्हणाले, विधानसभेत एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटील यांना निवडून आणले, तरीही पक्षाने माझ्याशी विश्वासघात केला. दोन दिवस अगोदर सांगितले असते तर मी ऐकले असते, पण शेवटच्या क्षणांपर्यंत झुलवले. हे नुकसान माझे नाही, पक्षाचे होणार आहे. अजितदादांनी मोठ्या मनाने उमेदवारी दिली, यात माझे काहीही नुकसान नाही. बालवडकर यांचा प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा फायदा बालवडकर हे बाणेर-बालेवाडी, पाषाण, सूस या भागात भाजपचे मजबूत चेहरा मानले जात होते. त्यांच्या बाहेर पडण्यामुळे प्रभाग ९ मध्ये भाजपची आधीची ताकद जवळपास अर्धी होऊ शकते. विशेषतः पाषाण भागात राष्ट्रवादीचा प्रभाव असल्याने बालवडकर यांचा प्रवेश अजित पवार गटासाठी मोठा फायदा ठरू शकतो. चंद्रकांत पाटील यांच्या आक्रमक राजकारणामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.