पुणे – पॉलिसी रिसर्च ऑर्गनाझेशन द्वारे सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या निकषांवर राज्यातील 27 महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स क्रमवारीत पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर पुणे महापालिकेला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ऍप आणि सोशल मीडिया अकाऊंटवरील माहितीवर ही क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने 10 पैकी 6.23, तर पुणे महापालिकेने 4.47 गुण प्राप्त केले आहेत.
उपलब्धता, सेवा आणि समाज माध्यम वापर अशा स्वतंत्र निकषांवर पुणे महापालिकेने चांगली कामगिरी केली असली तरी एकूण गुणांच्या निकषावर मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका पुढे असल्याचे दिसते.
उपलब्धता निकषावर पिंपरी चिंचवड महापालिकेने 8.57, तर पुणे महापालिकेने 5.24 गुण मिळवले आहेत. पारदर्शकता निकषावर पुणे महापालिकेला स्थान पटकावता आले नसून पिंपरी-चिंचवड महापालिकेने मात्र 6.36 गुण प्राप्त केले आहेत. सेवा निकषावर पुणे महापालिकेने 5.71 गुण मिळवले आहेत. संकेतस्थळ कार्यक्षमता निकषावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने 7.05 गुण मिळवले आहेत. मोबाइल या निकषावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने 5.0, तर पुणे महापालिकेने 3.4 आणि समाज माध्यम निकषावर पिंपरी- चिंचडवड महापालिकेने 10 पैकी 10 गुण मिळवले असून, पुणे महापालिकेला 6.67 गुणांवर समाधान मानावे लागले आहे.
क्रमवारीचे निकष
सेवा : शहरातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मिळणाऱ्या महापालिकेच्या किती सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत?
पारदर्शकता : महापालिकेच्या कारभारातली पारदर्शकता आहे का? आपण होऊन महापालिकेने माहिती ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे का?
उपलब्धता : महापालिकेची वेबसाइट, मोबाइल ऍप्लिकेशन वापरायला किती सुलभ आणि सोपे आहे?