प्रभात वृत्तसेवा पुणे – आयुकाच्या संशोधकांनी लहान आकारांच्या तारामंडळांबाबत एका नव्या अभूतपुर्व घटनेचा शोध लावला आहे. त्यांनी अभ्यासलेल्या जे१०४४+०३५४ तारामंडळाचा विस्तार ७१०० प्रकाशवर्ष असून आजुबाजूला सुमारे २०,००० प्रकाशवर्षाच्या अंतरावर आयनीकृत धुळीची काही रिंगणे पसरली आहेत. इतक्या लहान तारामंडळाच्या आजुबाजूला इतकी मोठी रिंगणे सापडण्याची ही पहिलीच वेळ असून या तारामंडळाचा अभ्यास विश्वनिर्मिती आणि उत्क्रांती समजून घेण्यास महत्त्वाची ठरेल. पुणेस्थित खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकशास्त्राचे आंतरविश्वविद्यालय केंद्राचे (आयुका) डॉ.एडमंड ख्रिश्चन हेरेंझ आणि सौमिल मौलिक या दोन संशोधक आणि टोक्यो विद्यापीठातील एका संशोधकाने या घटनेचा शोध लावला. त्यांच्यानुसार जे१०४४+०३५४ या लहान आकाराची तारामंडळे विश्वनिर्मितीच्या सुरूवातीला तयार झाली होती. त्यातुलनेत आपल्या आकाशगंगेचा विस्तार सुमारे एक लाख प्रकाशवर्ष इतका आहे, व त्याहून मोठ्या विस्ताराची तारामंडळे अस्तित्वात आहेत. लहान आकाराची तारामंडळे आणि त्यांच्या भोवती सापडणारी रिंगणे गेल्या वीस वर्षांपासून अभ्यासली जात आहेत. मात्र, तारामंडळाच्या भवती त्याच्या आकाराच्या तिप्पट क्षेत्राफळात पसरलेल्या आयनीकृत धुळीची रिंगणे सापडण्याची ही पहिली वेळ आहे. मोठ्या आकाराच्या तारामंडळांच्या आजूबाजूला अशाप्रकारची आयनीकृत धुळीची रिंगणे सापडत नाहीत. छोट्या आकाराच्या तारामंडळात ताऱ्यांची संख्या साधारणपणे काही दशलक्षात असते. या ताऱ्यांपैकी आपल्या सुर्यापेक्षा २० ते १०० पट मोठ्या आकाराचे तारे जास्त काळ जगत नाहीत. साधारणपणे ३० ते ५० लाख वर्षांनंतर या ताऱ्यांचा स्फोट होतो. या स्फोटामुळे ताऱ्याच्या नजिक असलेली धुळ दुरवर फेकली जाते. मोठ्या आकाराच्या तारामंडळांच्या प्रचंड गुरूत्वाकर्षणामुळे त्यांच्यात ताऱ्यांभोवती असलेली धुळ स्फोटानंतर जास्त लांब जात नाही. जे१०४४+०३५४ च्या आकारमुळे ही धुळ तारामंडळाच्या गुरूत्वाकर्षणात अडकत नाही आणि बाहेर फेकली जाते, पुढे ही धुळ या तारामंडळाच्या आजुबाजूला या प्रकारची रिंगणे तयार करते. अशी रिंगणे तयार होण्यासाठी दोन कोटी वर्षात ५०,००० ताऱ्यांचा स्फोट आवश्यक असल्याचा अंदाज आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या विश्वनिर्मितीबद्दल आपल्या गणिती प्रतिकृतीत अशा प्रकारचे रिंगणे तयार होत नाहीत. त्यामुळे विश्वनिर्मितीचे गुढ उकलण्यासाठी मानवाला विश्वनिर्मितीची सध्याची गणिती प्रतिकृतीची समजूत बदवाली लागणार आहे. या धुळीच्या रिंगणांचा नवी तारामंडळे तयार करण्यात काय भूमिका पार पाडली हे पुढे अभ्यासले जाईल.