Chapekar Chowk: पदपथ चालण्यासाठी व्यवसायासाठी? चापेकर चौकात पादचाऱ्यांची कोंडी
Chapekar Chowk : जुन्या हातगाड्या आणि वापरात नसलेल्या वस्तूही रस्त्यालगतच ठेवण्यात आल्या

पिंपरी – शहरातील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी असतात. मात्र चापेकर चौकातील पदपथांची सध्याची अवस्था पाहता, “हा पदपथ नेमका चालण्यासाठी आहे की सामान साठवण्यासाठी?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बसथांब्यालगत असलेल्या या फुटपाथवर विविध वस्तू, हातगाड्या, प्लॅस्टिकच्या क्रेट्स, पोती, लाकडी साहित्य आणि इतर टाकाऊ वस्तू ठेवण्यात आल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही.
चापेकर चौक परिसरात एका बाजूला बसथांबा, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टीचा भाग आहे. या परिसरातील पदपथावर काही ठिकाणी भाजीपाला किंवा अन्य साहित्य ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेट्सचा ढीग दिसून येतो.
काही जुन्या हातगाड्या आणि वापरात नसलेल्या वस्तूही रस्त्यालगतच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना थेट रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे. वाहतूक वर्दळीच्या चौकात पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागणे हे अपघाताला निमंत्रण ठरू शकते.
कचरा ठरू शकतो आजाराचे कारण
पदपथाच्या आजूबाजूला कचरा आणि अस्वच्छता दिसून येत असून, काही ठिकाणी पोती आणि इतर साहित्य तशाच अवस्थेत टाकून देण्यात आले आहे. त्यामुळे परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
चापेकर चौकातील पुलाखालील परिसराची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. येथेही जुने सोफे, हातगाड्या आणि विविध टाकाऊ वस्तू ठेवून दिल्याचे दिसते. त्यामुळे सार्वजनिक जागांचा वापर वैयक्तिक साहित्य साठवण्यासाठी होत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने या परिसराची पाहणी करून अतिक्रमण, अनावश्यक साहित्य आणि कचरा हटवावा, तसेच पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळा करून द्यावा.





