NCP: आमदार निधीच्या कामांची तपासणी करा
NCP:

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा स्थायी समितीत प्रस्ताव
NCP: कोथरूड विधानसभा मतदारसंघात जिल्हा नियोजन समिती, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम आणि अन्य विकास निधीतून पुणे महापालिकेमार्फत केलेल्या विकासकामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत या कामांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कामांचे विशेष लेखापरीक्षण, तसेच आवश्यकतेनुसार थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करावे, असा ठरावच स्थायी समितीत देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे समिती सदस्य अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, थेट उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील कामाचीच चौकशीची मागणी केल्याने स्थायी समितीच्या आज होणाऱ्या बैठकीत गोंधळ होण्याची शक्यता आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत कोथरूड मतदारसंघातील महापालिकेच्या चार जलतरण तलावांमध्ये युव्ही प्रणाली बसवली आहे. कै. बलभीम कोकाटे जलतरण तलाव, कै. धनंजय ताम्हाणे जलतरण तलाव (बाणेर), नाथुजी मेंगडे जलतरण तलाव (कर्वेनगर) आणि स्वामी विवेकानंद जलतरण तलाव (बावधन) येथे प्रत्येकी ९ लाख ५३ हजार ९०० रुपयांप्रमाणे एकूण ३८ लाख १५ हजार ६०० रुपये निधी खर्च केला आहे.
या चौकशीत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया, कंत्राट वाटप, कामाची गुणवत्ता व प्रमाण, मंजूर आराखड्याशी सुसंगततेची तपासणी करण्याची मागणी आहे. याशिवाय मोजमाप पुस्तिका, बिले, कार्यादेशासह देयकांचीही पडताळणी करण्यात यावी, असे ठरावात नमूद आहे.





