नागपूर : आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने आपल्या समर्थकांसह नागपूरमधील पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. निवडणुकीसाठी अविनाश परडीकर यांना पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी गणेश पेठ भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातील दूरदर्शन संच आणि खिडक्यांची तोडफोड केली. पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर म्हणाले, पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाराज होणे स्वाभाविक आहे. एका जागेसाठी १० पेक्षा जास्त जण इच्छुक होते, पण तिकीट फक्त एकालाच मिळू शकते. आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हटले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुण्यातील प्रभाग १० बावधनमधून जयश्री मारणे यांनी उमेदवारी जाहीर करत एबी फॉर्म दिले आहे. त्यानुसार जयश्री मारणे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पुण्यातील गुन्हेगारी थांबवा, असे म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पक्षानेच गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.