nagar | जिल्ह्यातील सर्व गोशाळांना ११ लाख रुपयांचा चारा

राहुरी, (प्रतिनिधी): नगर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असल्यामुळे मुंबई येथील वर्धमान संस्कार धाम या संस्थेचे राजू शहा यांनी जिल्ह्यातील सर्व गोशाळांना अकरा लाख रुपयांचा चारा पाठविला असल्याची माहिती राहुरी फँक्टरी येथील श्रीकृष्ण गोशाळेचे ललित चोरडिया यांनी दिली.
दुष्काळानिमित्त दोन महिने चारा पुरवण्यात यावा, अशी विनंती चोरडिया यांनी त्यांच्या ट्रस्टला केली होती. त्यांच्या ट्रस्टने ती मान्य करून त्वरित पाच लाख रुपये पाठवले. परत सहा लाख रुपये दुसरा हप्ता पाठवला.
एका महिन्यात अकरा लाख रुपये देणगी पाठवून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सुमारे 25 सर्व गोशाळेला त्यांच्यामार्फत चारा पुरवण्यात आलेला आहे. त्यांनी मदत केली म्हणून सर्व गोशाळेमध्ये चालू महिन्यात हिरवागार मका, सुपरनेपिअर व कोंडी गवत, ऊस आदी हिरवा चारा मिळाला आहे.
दुष्काळामुळे गोशाळेतील गोमातेची संख्या खूप वाढलेली आहे. देशी गोमाता दूध कमी देते म्हणून कोणी सांभाळायला तयार नाही .महाराष्ट्र सरकारचे एक रुपया सुद्धा कोणत्याही गोशाळेला मदत नाही. गोसेवा आयोग स्थापना होऊन एक वर्षे पूर्ण झालेले आहे. सरकार गोसेवा आयोगाला पूर्ण स्वातंत्र्य देत नाही. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य अतिशय सकारात्मक काम करणारी मंडळी आहेत.
दुष्काळामध्ये गोमाता वाचवण्याची काम करणाऱ्या वर्धमान संस्कार धाम या ट्रस्टचे नगर जिल्ह्यातील सर्व देशी गोभक्तांकडून आभार मानण्यात आले. जिल्हा गोसेवा महासंघाचे अध्यक्ष ललित चोरडिया, उपाध्यक्ष रवींद्र महाराज सुद्रिक, सेक्रेटरी गौतम कराळे व इतर सर्व सदस्यांनी यासाठी प्रयत्न केले होते.





