Flower Market: नवरात्रौत्सवात फुलबाजार बहरला! झेंडूचे दर थेट ६० रुपयांवर; ग्राहकांच्या खिशाला कात्री
Flower Market: पिंपरी, चिंचवड आणि भोसरीच्या बाजारपेठांमध्ये फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने किमतीत मोठी वाढ.

Flower Market- शारदीय नवरात्रोत्सवाच्या उत्साहात पिंपरी-चिंचवड शहरातील फूल बाजारपेठा चांगल्याच बहरल्या आहेत. घटस्थापनेपासून विविध प्रकारच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र तुलनेने आवक कमी असल्याने फुलांचे दर जवळपास दुपटीने वधारले आहेत. पितृपंधरवड्यात घसरलेल्या दरांमुळे संकटात सापडलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळू लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. देवीची प्रतिष्ठापना, दैनंदिन घटपूजा आणि सजावटीसाठी फुलांची मागणी वेगाने वाढली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि सांगवी येथील मुख्य बाजारपेठा फुलांच्या खरेदीसाठी गजबजून गेल्या आहेत. गणेशोत्सवानंतर पितृपंधरवड्यात फुलांचे दर कमालीचे घसरले होते. त्या काळात झेंडूला अवघा १० ते २० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फुले तोडून फेकून देण्याची वेळ आली होती. काहींनी तर तोडणीच बंद केली होती. मात्र नवरात्रौत्सव सुरू होताच बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. सध्या झेंडूचा दर थेट ५० ते ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. बाजारपेठेत झेंडूसोबतच शेवंती, निशिगंध, जरबेरा आणि गुलाबाची आवक होत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आवक अजूनही मर्यादित आहे.
हार तयार करण्यासाठी निशिगंधाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे निशिगंधाचे दर प्रतिकिलो २५० ते ३०० रुपयांवर गेले आहेत. शेवंतीलाही प्रतिकिलो १५० ते २०० रुपयांचा दर मिळत आहे. फुलांचे भाव वाढल्याचा थेट परिणाम हारांच्या किमतींवरही झाला आहे. किरकोळ बाजारात लहान-मोठ्या हारांचे भाव दुपटीने वाढले आहेत.
गणेशोत्सवापासून ते दसरा-दिवाळीपर्यंत फुलांना सलग मागणी असते. यंदा सुरुवातीला दर पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. काही भागांत उत्पादकांनी बागा काढून टाकल्या होत्या. परिणामी आता मागणी असूनही दर्जेदार फुलांचा तुटवडा जाणवत आहे. दसरा जवळ येईल तशी फुलांची मागणी आणि दर आणखी वाढतील, असा अंदाज शहरातील फूल विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.





