अंकारा, (तुर्कीये) :– भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या तुर्कीयेत आता पूराचे संकट निर्माण झाले आहे. भूकंपामुळे बेघर झालेल्या हजारो जणांना आता नव्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. भूकंपग्रस्त भागांमध्ये आलेल्या पूरामध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बचाव आणि मदत पथके अजूनही बेपत्ता असलेल्या 5 जणांचा शोध घेत आहेत, असे तुर्कीयेचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले.
आदियामान आणि सानलीउर्फीया या प्रांतांमध्ये रस्त्यांना नद्यांचे रुप प्राप्त झाले आहे. या पूरामध्ये रस्त्यावरील कार देखील वाहून गेल्या आहेत. अनेक घरे पूराच्या पाण्याखाली बुडली आहेत. तर भूकंपग्रस्तांसाठी सुरू असलेल्या आश्रय छावण्यांमध्येही पूराचे पाणी घुसले आहे.
सॅनलिउर्फीया प्रांतात पूरामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सीरियाच्या 5 जणांचाही समावेश आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या कारमधील अन्य दोघेजण गुदमरून मरण पावले आहेत. पूराच्या पाण्यात अडकलेल्या शेकडो जणांना वाचवण्यात आले आहे.
रुग्णालयात पूराचे पाणी घुसल्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांनादेखील तेथून हलवण्यात आले आहे. पूरामुळे अनेक बागातील इमारती कोसळल्याच्याही घटना घडल्या आहेत. भूकंपामुळे अर्धवट पडलेल्या इमारती पूरामुळे कोसळल्या आहेत.