Pakistan’s Punjab : पाकिस्तानच्या पंजाबमध्ये पुरामुळे २ लाख लोकांना हलवले
Pakistan’s Punjab – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे तब्बल २ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. देशाच्या पूर्व भागातील बहुतेक नद्यांना पूर आल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
इंडस, चिनाब, रावी आणि सतलज या नद्यांना कमी अधिक प्रमाणात पूर आला आहे. आगामी ४८ तासात या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे, असे पंजाब प्रांताच्या आपत्ती व्यवस्थापन सेवेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
कसूर, ओकारा, पाकपट्टण, बहावलनगर, वेहारी आणि नारोवल या भागांतील रहिवासांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाते आहे. या भागांमधील पूरक्षेत्रातून आतापर्यंत २५ हजार लोकांना तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर या भागांशिवाय लय्याह आणि भाक्कर या बागातून २ लाख लोकांना हलवण्यात आले आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले.
१ लाख ७५ हजाराहून अधिक लोकांनी स्वतःहून घरे सोडली, तर पूरग्रस्त भागात अडकलेल्या २५ हजार लोकांना सरकारी बचाव संस्थांनी बोटींद्वारे वाचवले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. चिनाब, रावी आणि सतलज या नद्यांच्या पुरामुळे शहरी भागातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. कालाबाघ आणि चश्मा भागात इंडस नदीमुळे आलेला पूर तुलनेने कमी प्रमाणात आहे.
भारताने दिला पूराचा इशारा !
रावी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन भारताने रविवारी पाकिस्तानला धोक्याचा इशारा दिला होता. हा इशारा मानवतावादी भूमिकेतून देण्यात आला होता. मे महिन्यात चार दिवस लष्करी संघर्ष झाल्यानंतर प्रथमच भारताने पाकिस्तानला अशाप्रकारे सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
ऑपरेशन सिंदूरपुर्वी भारताने पाकिस्तानबरोबरचा इंडस पाणी करार स्थगित केला. इंडस पाणी आयोगाच्या माध्यमातूनच नेहमी अशाप्रकारचा इशारा देण्यात येत असायचा. करार स्थगित केला असला तरी भारताने मानवतावादी भूमिकेतून हा इशारा पाकिस्तानला दिला आहे.





