नेपाळमध्ये पूर.! भूस्खलनामुळे ५१ ठार तर, पाच जण बेपत्ता

काठमांडू – नेपाळच्या पूर्व भागामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे आजपर्यंत किमान ५१ जण ठार झाले आहेत. काल रात्रीपासून झालेल्या भूस्खलनामुळे अन्य पाच जण बेपत्ता झाले आहेत.
कोशी प्रांतातल्या इलाम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शनिवारी रात्री झालेल्या भूस्खलनाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान ३७ जण ठार झाले, असे नॅशनल डिजास्टर रिडक्शन ऍथोरिटीने म्हटले आहे.
यात डेउमाय आणि मायजोगमाय महापालिकांमध्ये प्रत्येकी ८, इलाम महापालिका आणि सॅन्डकपूर ग्रामीण भागात प्रत्येकी ६ जण ठार झाले. सुर्योदया महापालिकेमध्ये ५, मंगसेबंग महापालिकेमध्ये ३ आणि फाकफोकथुम गावात एक ठार झाला, असे सरकारी निवेदनामध्ये म्हटले आहे.
पंचथरमध्ये दरड कोसळल्याने एक जण ठार झाला आणि खोतांग आणि उदयापूरमध्ये प्रत्येकी एक जण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुसवा जिल्ह्यात वाहून गेल्याने चौघे बेपत्ता झाले. पंचथरमध्ये दरडींखाली एक जण गाडला गेला.
नेपाळ लष्कर, पोलीस आणि सशस्त्र दलाचे कर्मचारी मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात केले गेले आहेत. सुरक्षा दलांनी इलाम जिल्ह्यात एका गर्भवती महिलेसह चौघांना हेलिकॉप्टरने वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. रौताहात जिल्ह्यात अंगावर वीज पडल्यामुळे तीन जण ठार झाले.
नेपाळमधील सातपैकी कोशी, मधेस, बांगमाती, माडकी आणि लुंबिनी या पाच जिल्ह्यांमध्ये मान्सून अजूनही सक्रिय आहे. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने काठमांडू शहरातील प्रवेश आणि शहरातून बाहेर जाण्याचे मार्ग प्रशासनाने बंद केले आहेत. आणखी किमान ३ दिवस लांब पल्ल्यांचे प्रवास टाळण्याचे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आले आहे.





