Pune District : सातत्याने दर ढासळत असल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात

रांजणी : ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाय आणि म्हशींच्या संगोपनातून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. हा व्यवसाय करत असताना शेतकरी संसाराला हातभार लावत आहेत; परंतु गेल्या काही महिन्यातील दुधाच्या दराची परिस्थिती पाहिली तर दुधाचा दर आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसविताना दुग्ध उत्पादक शेतकर्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सातत्याने दुधाचे दर ढासळत असल्याने दूध उत्पादक अक्षरशः मेटाकुटीला आले असून व्यवसाय बंद करण्याची वेळ येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आंबेगाव तालुक्यात डिंभे धरणाची निर्मिती होऊन सुमारे 30 वर्षांचा कालखंड उलटला आहे. तालुक्यात मुबलक प्रमाणात पाणी असल्याने शेतकर्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय चालू केला. गेली तीन दशके तालुक्यात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोपावला आहे; परंतु सध्याच्या परिस्थितीत दुग्ध व्यवसाय करणे अत्यंत जिकिरीचे झाले असून दुधाचे दर ढासळत असल्याने आणि जनावरांचा दूध उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने व्यवसाय बंद करायची वेळ शेतकर्यांवर आली आहे. शेतकरी हा शेती बरोबरच जोडधंदा म्हणून प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय करत आलेला आहे आणि दुग्ध व्यवसाय हाच शेतकर्यांच्या कुटुंबाचा प्रमुख आधार बनलेला आहे. परंतु गेल्या काही महिन्यातील दुधाच्या दराची परिस्थिती पाहिली तर दूध दरात वाढ होण्याऐवजी कपातच होत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते.
आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात चारा टंचाई जाणवत असतानाच अलीकडच्या काळात पशुखाद्याच्या किंमती भरमसाठ वाढल्याने दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान उन्हाळ्याच्या तोंडावर चारा टंचाई भेडसावणार असल्याने पशुपालक चिंतेत आहेत. त्यातच दुध उत्पादन खर्च पाहता दूध व्यवसायाचे गणित सातत्याने बिघडत चालले आहे. पशुखाद्याचे दर तर गगनाला भिडले असताना त्यामानाने दुधाला बाजार भाव चांगला मिळत नाही ही खरी शोकांतिका आहे. दुधाचा उत्पादन खर्च प्रति लिटर 35 ते 40 रुपये झाला आहे आणि दुधाला सरासरी दर मात्र 32 रुपये मिळत असल्याने दूध व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय न राहता आतभट्ट्याचा खेळ झाला असल्याचे शेतकरी बांधव बोलून दाखवतात.
साधारणतः सन 2023 सालापासून दुधाचे दर सातत्याने कोसळत आहेत. त्यामध्ये सुधारणा होत नसल्याने शेतकर्यांनी जनावरांकडे दुर्लक्ष केले. काहींनी तर दुभती जनावरे मिळेल त्या किमतीने विकण्याचा निर्णय घेतला. प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दूध दराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकर्यांकडून वारंवार केला जात आहे. बदलत्या ऋतूचा आणि वातावरणाचा दूध व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच गेल्या दोन वर्षापासून दुधाला दरही व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार दूध उत्पादक शेतकरी सातत्याने करीत आहेत. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सहकारी आणि खाजगी दूध संघांनी दूध खरेदीचे दर वाढवण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून सातत्याने होत आहे.
सध्या दूध उत्पादकांना एक लिटरला 20 ते 32 रुपये दर मिळत असला तरी शहरी भागात मात्र हेच दूध दुप्पट दराने विकले जात आहे. हा मोठा विरोधाभास असल्याचे प्रकर्षाने जाणवते. दुधाचे पडलेले दर आणि चारा तसेच पशुखाद्याचे वरचेवर वाढत जाणारे भाव यामुळे दूध उत्पादक शेतकरी गाय आणि म्हैस आदी जनावरे कमी करून इतर व्यवसायाकडे वळण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांनी घरगुती इतर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे.
-कुंडलिक जाधव, दूध उत्पादक रांजणी





