पुणे जिल्हा : दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेचे उपोषण

मंचर – राज्य सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, या मागणीसाठी पिंपळगाव खडकी ता.आंबेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी शनिवार, दि.५ रोजी दूध उत्पादक शेतकरी,महिला आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारचा निषेध केला.
उपोषणकर्ते प्रभाकर बांगर म्हणाले, राज्य सरकारने दुधासंदर्भात ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफला ३० रुपयांवरून २८ रुपये दर केला आहे आणि अनुदानाची रक्कम पाच रुपयावरून सात रुपये केली आहे. १ जुलै रोजी जे अनुदान सरकारने जाहीर केले होते.
ते अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही.शेतकऱ्यांना बाजारामध्ये कोणीही उधार राहत नाही. त्यांना रोखीने पशुखाद्य, चारा,डॉक्टरांची फी असा सगळाच खर्च रोखीने करावा लागतोय.
राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने फेरविचार करून निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना थेट ४० रुपये लिटरला बाजार भाव द्यावा. ३५ रुपये बाजारभाव दूध उत्पादक शेतकऱ्यांना परवडत नाही. दुधाचा एक लिटरचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.





