Pune : जीबीएसचा चैन्नईत पहिला बळी! 10 वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू, कशी आहे पुण्यातली परिस्थिती?

पुणेः शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराची रुग्णसंखेत वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या १६३ वरून आता १६६ झाली आहे. जानेवारी महिन्यात शहरात फोफावलेल्या जीबीएसची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कधी रुग्ण संख्या स्थिर राहत आहे तर कधी रुग्णसंख्येत वाढ होताना पाहिला मिळत आहे. अशातच तमिळनाडूमधील धक्कादायक बातमी समोर आली आहे. जीबीएस आजावर उपचार घेणाऱ्या एका १० वर्षांचा ३१ जानेवारीला मृत्यू झाला आहे. जीबीएसचा हा तमिळनाडूच्या चैन्नईत पहिलाच मृत्यू आहे. यामुळे आरोग्य यंत्रनेचे जीबीएसने टेन्शन वाढवल्याचे दिसत आहे. पुण्यातही पाच संशयित रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
पुणे शहरातील जीबीएस आजाराची रुग्णसंख्या १६६ झाली आहे. यापैकी १३० जणांची जीबीएसची पुष्टी झाली आहे. त्यापैकी ६१ जण आयुसीयुत उपचार घेत आहेत. तर २१ जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मिळत आहे. या रुग्णांपैकी ५२ रुग्ण आजारातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या इतर ठिकाणीही जीबीएसचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभागाकडून विशेष मोहिम राबवली जात आहे. बाधित क्षेत्रात जाऊन सर्वेक्षण मोहिमेवर भर दिला जात आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले जात आहे.
जलद पथकाकडून सर्वेक्षण मोहिमेवर भर
महापालिकेकडून जलद पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके बाधित क्षेत्रात जाऊन तिथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. पथकाने ६२ रुग्णांच्या घरांना आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भागांना भेट दिली आहे. या भागातील सिंहगड रस्ता, वडगाव बुद्रुक, माणिकबाग, नांदेडफाटा, नांदेड शहर, कोल्हेवाडी, खडकवासला, किरकटवाडी, डीएसके विश्व आणि धायरी आणि बजरंगी माला विहीर या परिसरात आढावा घेतला जात आहे.





