बिहारमधील पडताळणीचा पहिला टप्पा समाप्त; ६५ लाख मतदारांची नावे याद्यांमधून वगळणार!

नवी दिल्ली – मोठ्या राजकीय वादंगास कारणीभूत ठरलेल्या बिहारमधील मतदार याद्या पडताळणीचा पहिला टप्पा शुक्रवारी समाप्त झाला. त्या प्रक्रियेनंतर सुमारे ६५ लाख मतदारांची नावे याद्यांमधून वगळली जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. बिहारमध्ये सुमारे ७ कोटी ९० लाख मतदार आहेत. त्या राज्यात चालू वर्षीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे.
त्याआधी निवडणूक आयोगाने २४ जूनपासून मतदार याद्यांची पडताळणी सुरू केली. त्यासाठीची जबाबदारी बुथस्तरीय अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या बुथस्तरीय एजंटांवर सोपवण्यात आली. पहिल्या टप्प्यानंतर आयोगाने ९९.८६ टक्के मतदारांशी संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याचे नमूद केले.
एकूण ७.२३ कोटी मतदारांचे प्राप्त झालेले गणना पत्र डिजिटाईझड् करण्यात आले. अद्याप १.२ लाख मतदारांचे गणना पत्र प्राप्त झाले नाहीत. त्यांच्या गणना पत्रांचे १ ऑगस्टपर्यंत डिजिटायझेशन होईल.
प्रक्रियेवेळी सुमारे ३५ लाख मतदारांनी एकतर कायमस्वरूपी स्थलांतर केले आहे किंवा त्यांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. जवळपास २२ लाख मतदारांचे निधन झाले. तर, ७ लाख मतदारांच्या नावांची नोंद एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे आढळले.
गणना पत्र न भरणाऱ्या, निधन झालेल्या आणि स्थलांतर केलेल्या मतदारांविषयीची माहिती बिहारमधील सर्व १२ राजकीय पक्षांना उपलब्ध करण्यात आली आहे. आता १ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यापुढे १ सप्टेंबरपर्यंत पात्र मतदारांना याद्यांमध्ये समाविष्ट करण्याची आणि अपात्र मतदारांना वगळण्याची संधी मिळेल.





