Shirur News: आधी मोटारीला धडक अन् उडी मारताच चालकाविना सुसाट ट्रक थेट घरात; लहान मुले खेळत असताना…
Shirur News: अण्णापूरजवळ थरार; चालकाची चालत्या ट्रकमधून उडी

शिरूर : लोखंडी सळयांनी भरलेला भरधाव ट्रक आधी एका मोटारीला धडकला. त्यानंतर पाठलाग होत असल्याच्या संशयाने चालकाने ट्रक नागमोडी पद्धतीने घेत, अण्णापूरजवळ चक्क चालत्या ट्रकमधून उडी घेतली.
चालकाविना सुसाट झालेला ट्रक काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या खाली उतरला आणि एका बंगल्याच्या पायरीवर जाऊन आदळला. यावेळी पायरीवर खेळत असलेली मुले प्रसंगावधान राखून घरात पळाल्याने मोठा अनर्थ टळला. शिरूर-पाबळ रस्त्यावर सोमवारी (ता. २४) रात्री घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी ट्रकचालक अप्पासाहेब विलास शिंदे (रा. चंदननगर, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
सोमवारी श्रावणी सोमवार असल्याने शिरूर शहर ते रामलिंग या मार्गावर मोठी वर्दळ होती. रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास शिंदे हा एमएच १२ एचडी ९८०१ क्रमांकाचा लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक घेऊन शिरूर-पाबळ मार्गाने जात होता. रामलिंगहून पुढे गेल्यानंतर ट्रक भरधाव वेगाने चालविताना एका मोटारीला मागे टाकण्याच्या प्रयत्नात ट्रकचा मोटारीला धक्का लागला.
मोटारचालकाने हॉर्न वाजवून ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र शिंदे याने ट्रक न थांबविता पुढे दामटला. मोटारचालक व काही दुचाकीस्वार आपला पाठलाग करीत असल्याचा संशय आल्याने त्याने ट्रक आणखी बेदरकारपणे चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे ट्रक रस्त्यावर जोरदार हेलकावे खात नागमोडी पद्धतीने धावू लागल्याने काही काळ रस्त्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अण्णापूर गावाजवळ आल्यानंतर चालकाने चालत्या ट्रकमधून उडी घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रस्त्याकडील गवतात पडल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. मात्र चालकाविना ट्रक काही अंतर सुसाट धावत राहिला. त्यानंतर रस्त्याच्या खाली उतरून अण्णापूर येथील विलास शिंदे यांच्या बंगल्याच्या पायरीवर जाऊन आदळला. उंच पायऱ्यांमुळे ट्रक तेथेच अडकून थांबला.
मोठी जीवितहानी टळली
विशेष म्हणजे, ज्या पायरीवर ट्रक आदळला, त्याच ठिकाणी काही मुले खेळत बसली होती. सुसाट ट्रक घराच्या दिशेने येताना दिसताच मुलांनी प्रसंगावधान राखून घरात धाव घेतली. काही क्षणांचा हा फरक ठरल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघातात बंगल्याचे नुकसान झाले असून, ट्रकच्या दर्शनी भागाचाही चक्काचूर झाला आहे.
ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राहुल भागवत, सहायक फौजदार राजेंद्र चव्हाण, वाहतूक पोलिस अंमलदार शेखर झाडबुके, सचिन गोरे, शिवाजी बनकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा पंचनामा करून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चालत्या ट्रकमधून उडी घेतल्याने जखमी झालेल्या शिंदे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, मोटारीला धडक देऊन न थांबता पसार होणे आणि त्यानंतर चालकाविना ट्रक सुसाट धावणे या प्रकारामुळे शिरूर-पाबळ मार्गावरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





