pune : भाजप शहराध्यक्षांचा पत्रप्रपंच

सुनेत्रा पवार यांच्यापुढे मांडला तक्रारींचा पाढा
pune : पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, आता या वादात दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांमध्ये लेटर वॉर सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला ११९ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही महायुतीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सन्मानपूर्वक वागणूक, प्रभाग समितीत प्रतिनिधित्व आणि पुरेसा निधी देण्यात आला, असा दावा घाटे यांनी पत्रात केला आहे.
मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तिरंगा यात्रा, मुख्यमंत्री आणि महापौरांवर टीका केली, तसेच स्थायी समितीतील दोन सदस्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीच्या चौकशीची मागणी केल्याचा उल्लेख घाटे यांनी केला आहे. या प्रकारांबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकांना जाब विचारण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, असा आरोपही घाटे यांनी केला.
दरम्यान, मंगळवारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काळ्या फिती बांधून भाजपचा निषेध केला आणि विकासकामांच्या विषयांनाही विरोध केला. हे महायुतीच्या धर्माला हरताळ फासणारे असल्याचा दावा घाटे यांनी केला असून, राष्ट्रवादीच्या शहर नेतृत्वाने आणि नगरसेवकांनी महापालिका स्तरावर महायुतीच्या समन्वयाने काम करण्यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी सुनेत्रा पवारांकडे केली आहे.





