Sunetra Pawar : अजितदादांशिवाय पहिलीच निवडणूक: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
Sunetra Pawar : अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जात कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

Sunetra Pawar : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे भावूक वातावरण आहे. अजित पवार यांची खासियत म्हणजे ते सकाळी लवकरच मतदान करत असे. अगदी त्याच पद्धतीने त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज कुटुंबासह काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत पवार कुटुंबातील पार्थ पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, शर्मिला पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रावादी एकत्र आल्या आहेत. अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत ७ हजार ४३८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २ हजार ६३४ तर पंचायत समितीसाठी ४ हजार ८१४ उमेदवार मैदानात उतरले आहेत.
निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित १२ जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या काळातच अजित पवार यांचे निधन झाल्याने पक्षाने सभा रद्द करून केवळ उमेदवारांनी घरी जाऊन प्रचार केला.
या ठिकाणी होत आहे मतदान
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक होत आहे.





