Crime News : नेवासे बुद्रुकमध्ये पारधी वस्तीत गोळीबार; एक गंभीर जखमी
Crime News : या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

नेवासे : नेवासे बुद्रुक शिवारातील नागफणी परिसरात पारधी समाजाच्या दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर गोळीबारात झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.१०) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागफणी परिसरात राहणाऱ्या पारधी समाजातील दोन गटात काही कारणावरून वाद झाला होता. या वादाने पहाटेच्या सुमारास हिंसक वळण घेतले आणि त्यातून गोळीबाराची घटना घडली. गोळी लागल्याने एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
वादाचे कारण गुलदस्त्यात
या दोन गटांमध्ये नेमका कशावरून वाद झाला आणि गोळीबार नेमका कोणी व का केला? याबाबतची खरी माहिती अद्याप समोर आलेली नाही. जखमीचा जबाब नोंदवण्यासाठी शनिवारी सकाळी नेवासे पोलिसांचा एक कॉन्स्टेबल नगरला रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलीस या घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याने या प्रकरणाची अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे नेवासे बुद्रुक आणि नागफणी परिसरात खळबळ उडाली असून पोलिस परिस्थिवर लक्ष ठेऊन आहेत.





