आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; एक लाखांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर

मुंबई – आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना अखेर जामीन मंजूर झाला असून एक लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अविनाश भोसले यांना 26 मे 2022 रोजी येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली होती.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची अखेर 2 वर्षांनी कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयने 2022 मध्ये केलेल्या अटकेपासून ते कारागृहत होते. मुंबई सत्र न्यायालयाने गेल्यावर्षी जामीन फेटाळल्यानंतर अविनाश भोसले यांनी जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली.
हायकोर्टाने आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी जाहीर केला. अविनाश भोसले यांना परवानगीविना देशाबाहेर जाण्यास मनाई करत तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, काहीकाळापासून भोसले हे वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयातील जेलवॉर्डातच होते.





