Shikrapur Crime : शिक्रापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; कुटुंबाला धमकी देणाऱ्या ‘त्या’ आरोपीबाबत न्यायालयाचा निर्णय
Shikrapur Crime : फेब्रुवारी महिन्यातील फिर्यादीनंतर सुरू होती कायदेशीर लढाई; सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने दिला निर्णय.

Shikrapur Crime – एका महिलेवर तिच्या पतीला व मुलीला मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीला शिरूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. समर्थ संतोष सासवडे (रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीडित महिलेने शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली होती.
आरोपीने महिलेला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची भीती दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. यानंतर शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. काही काळ पोलीस कोठडीत राहिल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान, आरोपीने ॲड. केदार शितोळे, ॲड. राजेश राठोड आणि ॲड. अमेय बलकवडे यांच्यामार्फत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावरील सुनावणी दरम्यान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला. दोन्ही बाजूंचा विचार करून न्यायालयाने काही अटी व शर्तींच्या अधीन राहून समर्थ सासवडे याला जामीन मंजूर केला असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे ऑडिटर ॲड. केदार शितोळे यांनी दिली आहे.




