Pune District : महा-ई-सेवा केंद्राकडून ग्राहकांची आर्थिक लूट

मंचर : आंबेगाव तालुका व मंचर शहरातील ठराविक महा-ई-सेवा केंद्रांकडून ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. याबाबत घोडेगाव तहसीलदारानी आर्थिक लूट करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रावर कारवाई करावी.या मागणीचे निवेदन भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांनी घोडेगाव तहसीलदार संजय नागटिळक यांना दिले.
घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार संजय नागटिळक यांची भेट घेऊन भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांनी आर्थिक लूट करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्र चालकांच्या विरोधात निवेदन दिले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते कालिदास गांजाळे, नवनाथ थोरात, सुनीत थोरात उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, आंबेगाव तालुका व मंचर शहरातील काही महा-ई-सेवा केंद्र अतिशय चांगलं काम करत आहेत. परंतु ठराविक असे महा-ई-सेवा केंद्र आहेत. जे नागरिकांकडून अवाच्या सव्वा पैसे आकारतात. ऑनलाईन फॉर्म भरणे किंवा इतर गोष्टी करण्यासाठी शंभर ते दोनशे रुपये ज्या ठिकाणी लागतात.
त्या ठिकाणी हजार ते दोन हजार रुपये घेतले जातात. तसेच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे दर पत्रक लावलेले नाही. सर्वांना दर पत्रक त्वरित लावण्यास सांगा. तसेच शासनाने ठरवलेली फी नागरिकांकडून आकारण्यात सांगावी. जे महा-ई-सेवा केंद्र चालक शासनाचे नियम पाळून काम करणार नाही. त्यावर कडक कारवाई करून त्याचे लायसन रद्द करा,अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार संजय नागटिळक म्हणाले महा-ई-सेवा केंद्र चालकांना पत्रक काढून दरपत्रक लावायला सांगू.
तसेच योग्य पैसे नागरिकांकडून घ्यायला सांगू. जर महा-ई-सेवा केंद्र चालक ग्राहकांची आर्थिक अडवणूक करत असेल तर आम्हाला त्वरित संपर्क करून सांगा. त्याच्यावर योग्य ती कारवाई आमच्या माध्यमातून केली जाईल, असा शब्द तहसीलदार नागटिळक यांनी दिल्याचे संजय थोरात यांनी सांगितले.





