अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांना दोन वर्षाची मुदतवाढ

नवी दिल्ली – अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांना दोन वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे. आता त्यांचा कार्यकाळ मार्च 2027 पर्यंत चालणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
नागेश्वरन यांनी 28 जानेवारी 2022 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार अर्थ मंत्रालयाला विविध विषयावर सल्ला देतात. त्याचबरोबर आर्थिक सर्वेक्षण त्यांच्या नेतृत्वाखाली तयार होत असते. या अगोदर या पदावर के व्ही सुब्रमण्यन होते. अर्थ मंत्रालयाने सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये 2024-25 या आर्थिक वर्षाचा विकासदर 6.3 ते 6.8% राहील असे सांगितले आहे.
दुसर्या तिमाहीचा विकास दर कमी झाल्यामुळे या आर्थिक वर्षाचा विकासदर कमी होणार असल्याचे यातून स्पष्ट होते. या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी नागेश्वरन यांनी देशातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक विषयावर संशोधन केले आहे.





