Vishaka Subhedar : इराणवर इस्राइल आणि अमेरिका करत असलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. ११ दिवस उलटल्यानंतरही संघर्ष कायम आहे. या संघर्षामुळे अनेक भारतीय तसेच महाराष्ट्रातील नागरिक दुबईसह इतर ठिकाणी अडकून पडले आहेत. यातील काही नागरिक सुखरुप मायदेशी परतले आहेत. मात्र, अजूनही अनेक जण मायदेशी परतण्यासाठी प्रतिक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मुलगा कुवेतमध्ये अडकल्याचे सांगितले. हे सांगताना अभिनेत्री ढसाढसा रडली होती. मुलगा अभिनय सुभेदार याला महाराष्ट्रात आणण्याची विनंती तिने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाला परत आणण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ विशाखा सुभेदार यांच्या मुलाला परत आणण्यासाठी प्रयत्न केले आणि काल रात्री ३ वाजता अभिनय सुभेदार मुंबई विमानतळावर दाखल झाला. मुलाला पाहून विशाखा सुभेदार यांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि ती रडू लागली. यानंतर अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने एका वाहिन्यासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली. Vishakha Subhedar “व्हिडीओ केला होता तेव्हाही माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि आज आनंदाश्रू आहेत. मी पोराला जवळजवळ १० दिवसांनी पाहिलं. कुवेतला ज्या हॉटेलमध्ये तो राहत होता तिथे जवळच मिसाईल, ड्रोन पडत असल्याचं तो सांगायचा तेव्हा मी टेन्शनमध्ये असायचे. खूप घाबरले होते. आता त्याला बघून खूप आनंद झालाय. तिथे नक्की काय परिस्थिती होती ते आता त्याने आल्यावर सविस्तर सांगितलं. दिवसरात्र सायरन वाजत होते ज्यामुळे भीतीचंच वातावरण होतं असं तो म्हणाला.” अशी प्रतिक्रिया लेक परतल्यानंतर अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने दिली. ती पुढे म्हणाली, “आज १२० लोक परत आले. त्यापैकी २४ जणांचे व्हिसा अडकले होते. सरकारने सगळ्यांचं काम केलं. मुलाला कसं आणता येईल यासाठी मी तो व्हिडीओ पोस्ट केला होता आणि एकनाथ शिंदेंनी लगेच त्याची दखल घेतली. कोणी म्हणत होतं की दुबईतून लगेच व्यवस्था होऊ शकते पण कुवेतमधून अवघड आहे. कारण तिथली एअरस्पेस मिळत नव्हती. म्हणून मी जास्त चिंतेत होते. पण सरकारने तात्काळ दखल घेतली आणि सूत्र हलवली. कुवेतचा व्हिसा नंतर सौदीचा व्हिसा हवा होता. एम्बेसीकडून सर्व व्यवस्था केली गेली. या सगळ्या यंत्रणेमुळेच आज अभिनय घरी परतला आहे त्यामुळे त्यांचे आभार.” अभिनय सुभेदार कसा अकडकला? Visakha Subhedar दहा दिवसांपूर्वी अभिनय सुभेदार लंडनला जात होता, मात्र मध्य पूर्वेतील तणावामुळे त्याचं विमान कुवेतमध्ये उतरलं. नेमकं त्याच वेळी इराणने कुवेतवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केल्याने कुवेतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. विमान कंपन्यांनी अनिश्चित काळासाठी पुढील सर्व उड्डाणंही रद्द केली. त्यामुळे अभिनय कुवेतमध्ये अडकला होता. अन् मिठी मारली Visakha Subhedar मुंबई विमानतळावरुन विशाखा सुभेदारांचा मुलगा अभिनय सुभेदार बाहेर येताना दिसतोय. गेटच्या बाहेर येताच अभिनय आपल्या आईच्या दिशेने येतो, मुलाला पाहून आधीपासूनच भारावलेल्या विशाखा सुभेदार धावतच मुलाच्या दिशेने जातात आणि त्याला कडकडून मिठी मारतात. मुलाला मिठी मारताच विशाखा सुभेदार ढसाढसा रडू लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा : Corn Buying Tips: सावधान! जास्त पिवळे आणि चमकदार मक्याचे कणीस ठरू शकते धोकादायक; खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा