US Israel Iran War: होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराण आरपारच्या भूमिकेत ; ट्रम्पच्या धमकीचीही उडवली खिल्ली
US Israel Iran War: इस्लामाबादमधील 'शांतता चर्चा' फिस्कटल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

US Israel Iran War: इस्लामाबादमधील ‘शांतता चर्चा’ फिस्कटल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इराणच्या नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत कडक इशारा दिला आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नौदलाने,” होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ‘शत्रू’कडून कोणतीही चूक झाल्यास ती प्राणघातक ठरू शकते” ,म्हटले आहे. इराणच्या नौदलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये हा इशारा दिला आहे. तसेच, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सद्यस्थितीचे ड्रोनद्वारे टिपलेले फुटेजही शेअर केले आहे.
IRGC चा होर्मुझवर नियंत्रणाचा दावा US Israel Iran War:
IRGC नौदलाने, “होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सर्व हालचाली आणि थांब्यांवर इराणी सशस्त्र दलांचे पूर्ण नियंत्रण आहे. तसेच, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये शत्रूकडून कोणतीही चूक झाल्यास ती प्राणघातक ठरू शकते, असेही त्यात म्हटले आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दोन अमेरिकी युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेल्याची आणि सामुद्रधुनीत सुरुंग निकामी करण्याची मोहीम सुरू केल्याची घोषणा केल्यानंतर दोन दिवसांनी IRGC नौदलाने हा इशारा दिला आहे. मात्र, इराणच्या मुख्य लष्करी कमांड, खतम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर्सने, यूएस सेंट्रल कमांडचा दावा फेटाळून लावला.
शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इराणच्या सरकारी प्रेस टीव्हीने रविवारी म्हटले की, अमेरिकन लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून विनाशिका (डिस्ट्रॉयर) पाठवण्याचा केलेला प्रयत्न हा तेहरान-वॉशिंग्टन चर्चेशी संबंधित एक अयशस्वी प्रचारकी स्टंट होता.
प्रेस टीव्हीने अमेरिकन विनाशिकांची ओळख यूएसएस मायकल मर्फी आणि यूएसएस फ्रँक ई. पीटरसन अशी सांगितली. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, इराणी नौदलाने त्यांना माघार घेण्यास भाग पाडले.
अमेरिका-इराण युद्धविरामावर असहमत US Israel Iran War:
तसेच, रविवारी एका निवेदनात, आयआरजीसीने म्हटले की, कोणत्याही बहाण्याने किंवा नावाने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ जाण्याचा प्रयत्न करणारे कोणतेही लष्करी जहाज हे युद्धविरामाचे उल्लंघन मानले जाईल आणि त्यावर कठोर कारवाई केली जाईल.
इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर ही घडामोड समोर आली आहे. जवळपास महिनाभर चाललेल्या तीव्र संघर्षानंतर, इराण आणि अमेरिकेने दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. मात्र, या करारामध्ये नमूद केलेल्या अटींवर दोन्ही देशांमध्ये एकमत होऊ शकले नाही.






