अखेर २० जागांचा तिढा सुटला! मुंबईसाठी भाजप शिवसेना युतीचे जागावाटप जाहीर; पाहा कोणाला किती जागा मिळाल्या?

Mumbai Municipal Corporation Election : आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षात बैठकांचा सिलसिला सुरू होता. या महापालिका निवडणुकीसाठी २० जागांवर निर्णय अंतिम होत नव्हता. अखेर काल झालेल्या बैठकीत २० जागांचा तिढा सुटला असून, मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना शिंदे पक्षाने जागावाटपाचा फॅार्म्युला निश्चित केला आहे.
मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग असून यापैकी १३७ जागा भाजप लढणार असून, ९० जागा शिवसेना शिंदे पक्षाला देण्यात आला आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत भाजप शिवसेनेच्या महायुतीने जागावाटप जाहीर केले आहे. या जागावाटपात भाजपच मोठा भाऊ असल्याचे दिसत आहे. खरंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवेसनेत जागावाटप करताना मोठा संघर्ष निर्माण झाला होता. बऱ्याच घासाघाशीनंतर जागावाटप तयार करण्यात आले. पण २० जागांवर निर्णय होत नव्हता. अखेर या जागांचा तिढा सोडविण्यात भाजप शिवसेनेला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला १५० ते १६० जागा मिळतील आणि शिवसेनेला ६० किंवा ७० जागांवर समाधान मानावे लागेल अशी चर्चा होती. पण तसे काही प्रत्यक्षात झाले नाही. त्यामुळे शिवसेनेने आपल्या पदरात जास्तीत जास्त पाडून घेण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवला आहे. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल करण्यासाठी भाजपचे प्रमुख नेते शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ठाण्यातील आनंदवन या निवासस्थानी काल रात्री आले होते.
दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. ही बैठक तब्बल पाच तास सुरू होती. या बैठकीत २० जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जात होता. अखेर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे आजचा दिवस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा असणार आहे.
हेही वाचा : Satara News: महाराष्ट्र केसरीसाठी साताऱ्याची तयारी जोरात; औंध येथे माती-गादी कुस्तीचा थरार रंगणार





