अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा; ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी; काय आहे कारण ?

Ajit Pawar And Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. सिंचन घोटाळ्या प्रकरणी खूली चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. आर. आर. आबांनी आपला केसाने गळा कापला असल्याचे विधान अजित पवार यांनी केले.
सध्या अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच आबांचे केस हे खूप लहान होते. त्यामुळे ते केसाने गळा कापू शकत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला.
काय म्हणाले संजय राऊत?
“आर. आर. पाटील हे अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार गृहमंत्री होते. गृहमंत्री म्हणून त्यांनी काही चुकीचं काम केलं असं आम्हाला वाटत नाही. चौकशीचे आदेश देण्याची सही जर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दाखवली असेल तर तो गोपनियतेचा भंग आहे. अशा पद्धतीने गोपनीयतेचा भंग करणे हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे राज्यपालांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे. तुम्ही जनतेसमोर या गोष्टी कशा काय दाखवू शकता?,” अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला आहे. Ajit Pawar And Devendra Fadnavis |
अजित पवार काय म्हणाले ?
भाजपने आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्यावर फोडले आहे. त्यावेळी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. आणि चौकशी करण्यासाठी फाइल तयार करण्यात आली. त्या फाइलवर आर. आर. आबांनी सही केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर हा केसाने गळा कापण्यासारखा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.
रोहित पाटील यांचे प्रत्युत्तर
अजित पवारांच्या या विधानावर आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवारांनी आबांवर केलेली टीका आमच्यासाठी दु:ख आहे. आबा गेले तेव्हा मी साधारण 15 वर्षांचा होतो. आबांना जाऊन 9 ते साडे 9 वर्षे झालेले आहेत. आज मी अजित पवारांच्या टीकेला उत्तर देणार नाही, कारण अजित पवार वरिष्ठ नेते आहेत. एखादा घोटाळा आपण केला नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. ते आज हयात असते तर त्यांनी अजित पवारांना चांगल्या भाषेत उत्तर दिले असते,” असे रोहित पाटील म्हणाले.





