राजस्थानात हवाई दलाचे जॅग्वार विमान कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू

Air Force Plane Crash: राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार ट्रेनर विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. चुरूचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी सांगितले की, ही घटना दुपारी 12:30 च्या सुमारास भानुदा गावाजवळील शेतात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विमानाचा ढिगारा शेतात पसरलेला दिसला, तर परिसरात धुराचे लोट आणि आग दिसून आली.
भारतीय हवाई दलाने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “आयएएफ जॅग्वार ट्रेनर विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान चुरूजवळ कोसळले. दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नाही. हवाई दल या दु:खद घटनेवर शोक व्यक्त करते आणि शोकाकूल कुटुंबांसोबत आहे. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.”
#WATCH | Rajasthan: An IAF Jaguar Trainer aircraft crashed near Churu during a routine training mission today. Both pilots sustained fatal injuries in the accident. Visuals from the spot.
IAF says that no damage to any civil property has been reported. A court of inquiry has… pic.twitter.com/WtoiEAy7ss
— ANI (@ANI) July 9, 2025
ही यंदाची तिसरी जॅग्वार विमान दुर्घटना आहे. यापूर्वी मार्चमध्ये हरियाणातील अंबाला येथे आणि एप्रिलमध्ये गुजरातच्या जामनगरजवळ जॅग्वार विमाने कोसळली होती. एप्रिलच्या दुर्घटनेत वैमानिक सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला होता, तर दुसऱ्या वैमानिकाला वाचवण्यात यश आले होते. मार्चमध्ये अंबालाजवळील दुर्घटनेत वैमानिक सुखरूप बाहेर पडला होता, तर त्याच दिवशी पश्चिम बंगालच्या बागडोग्रा येथे एएन-32 विमान कोसळले होते.
जॅग्वार ही जुनी पण सतत सुधारित केलेली विमाने आहेत, जी हवाई दलात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे विमानांच्या देखभाल आणि सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थस्थित होत आहेत.





