DA Hike : दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; चार राज्यांत DA वाढ, कुठे किती फायदा?
DA Hike : दिवाळीपूर्वी राजस्थान, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारने DA/DR मध्ये 2 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली. जाणून घ्या कुठे किती फायदा होणार.

DA Hike : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनंतर राजस्थान, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारने सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना दिलासा दिला आहे. या राज्यांनी महागाई भत्ता (DA) आणि महागाई राहत (DR) मध्ये 2 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. केंद्र सरकारनेही DA/DR मध्ये 3 टक्के वाढ करून तो 60 वरून 63 टक्के केला असून, ही वाढ 1 जुलै 2026 पासून लागू आहे.
राजस्थान : राज्यातील 7 लाखांहून अधिक कर्मचारी आणि 5 लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना 3 टक्के वाढीचा लाभ मिळणार आहे. DA/DR 63 टक्के झाला आहे. जुलै ते ऑक्टोबरचा एरियर कर्मचाऱ्यांच्या GPF खात्यात जमा केला जाणार आहे. निवृत्तीवेतनधारकांना एरियर रोख स्वरूपात मिळेल. सुमारे 6 लाख पात्र कर्मचाऱ्यांना तदर्थ बोनसही जाहीर करण्यात आला आहे.
तमिळनाडू : सरकारी कर्मचारी, शिक्षक, निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी DA/DR मध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे DA 63 टक्के झाला असून, 1 जुलै 2026 पासून त्याची अंमलबजावणी होईल. सुमारे 16 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे 1,858 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
मध्य प्रदेश : कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 2 टक्के वाढ करून ती जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली आहे. जानेवारी ते सप्टेंबरचा 9 महिन्यांचा एरियर तीन समान हप्त्यांत दिला जाणार आहे. निवृत्तीवेतनधारकांना 2 टक्के वाढीव DR जुलै 2026 पासून मिळणार आहे.
छत्तीसगड : कर्मचाऱ्यांचा DA 58 वरून 60 टक्के करण्यात आला आहे. ही वाढ 1 नोव्हेंबर 2026 पासून लागू होईल. सुमारे 3.85 लाख कर्मचारी आणि 1.50 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. सरकारवर वर्षाला सुमारे 432 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
दरम्यान, DA म्हणजे महागाईमुळे वाढलेल्या खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा भत्ता. निवृत्तीवेतनधारकांना याच स्वरूपात DR दिला जातो. महागाईच्या स्थितीनुसार केंद्र आणि राज्य सरकारे साधारणपणे सहा महिन्यांनी या दरांचा आढावा घेतात.





