Pune Crime : पुण्यात अफू विक्री करणाऱ्या तिघांना अटक; 1.48 लाखांचा मुद्देमाल जप्त
Pune Crime : पुण्यात अफू विक्रीसाठी आलेल्या राजस्थानमधील तिघांना गुन्हे शाखेने अटक केली. १५६.१६ ग्रॅम अफूसह दोन मोबाईल, वजनकाटा आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

Pune Crime : पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली. रामनिवास भवरराम बिष्णोई (वय २२), प्रकाश सुरजाराम बिष्णोई (वय ३२) आणि कैलाश सहीराम बिष्णोई (वय २२, तिघेही रा. खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी, पुणे; मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून १५६.१६ ग्रॅम वजनाचा ७८ हजार ८० रुपयांचा अफू, दोन मोबाईल, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी असा एकूण १ लाख ४८ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खंडणी विरोधी पथक एकमधील पोलीस हवालदार प्रणव संकपाळ आणि भोसले हे १२ ऑक्टोबर रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यावेळी परिमंडळ दोनच्या हद्दीत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात तिघे जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. त्यांनी ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना दिली.
त्यानंतर मदन कांबळे यांनी पथकासह भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन माहितीची पडताळणी केली. १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री २.४० वाजण्याच्या सुमारास गुजर निंबाळकरवाडी येथील खोपडे नगरमधील शिवतीर्थ बंगल्यासमोरील मोकळ्या मैदानात तिघे जण आढळून आले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेला १५६.१६ ग्रॅम अफू, दोन मोबाईल, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि दुचाकी असा मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१७/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), १७ (ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई –
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त एक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खंडणी विरोधी पथक एकचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हवालदार प्रणव संकपाळ भोसले सावंत शिंदे , दुर्गे पोलीस शिपाई जगताप , खेडकर आणि महिला पोलीस शिपाई शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.





