Pune : विधानपरिषदेच्या जागांसाठी फिल्डिंग लावायला सुरूवात; पुण्यातून ‘या’ नेत्यांना मिळू शकते संधी

पुणेः ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशला सुरूवात झाली आहे. १० मार्चला राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करणार आहेत. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरले असून दररोज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांध्ये विविध प्रश्नांना घेऊन खडांजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे चर्चा सुरू झाली आहे ती विधानपरिषदेच्या ५ जागांची. या रिक्त जागांसाठी २७ मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे प्रत्येक इच्छुकांनी विधानपरिषदेवर जाण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. या जागांवर कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता लागलेली आहे.
विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी भाजपला २, शिवसेना १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा दिली जाणार आहे. पाच जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यास मतांचा कोटा ५७ आहे. मात्र, मविआतील तिन्ही पक्षाकडे एकत्रित मतांची बेरीज केली तरीही त्यांची मते ५७ होत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधानपरिषदेवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे आहे. पुणे शहरातून भाजपचे माजी स्थायी समिती अध्यक्ष जगदीश मुळीक यांना संधी देऊ शकते, अशी चर्चा होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दीपक मानकर यांनी देखील संधी मिळू शकते.
मुळीक, मानकर यांना संधी?
विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी या मतदार संघातून जगदीश मुळीक यांनी निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेली. यामुळे मुळीक हे नाराज झाले होते. यानंतर त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मूळीक यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगेसचे दीपक मानकर यांनी देखील पक्षातून बाहेर जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अजित पवारांसोबत मानकर यांचा संवाद झाला आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्येच थांबण्याचा निर्धार केला. यामुळे या दोन्ही नेत्यांना पक्षांच्या वरिष्ठांनी त्यावेळी शब्द दिला असावा, म्हणून या जगदीश मुळीक आणि दीपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाऊ शकते.





