FIDE Candidates 2024 : डी. गुकेश इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर…

FIDE Candidates 2024 : टोरंटो येथे होत असलेली कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या १७ वर्षीय डी. गुकेशकडे (D. Gukesh) विजेतेपद जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. गुकेशने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच शानदार खेळ दाखवला आहे. दरम्यान, १३ व्या फेरीत त्याच्याकडे अधिक लक्ष होते. या फेरीत त्याचा सामना होता फ्रान्सचा आघाडीचा खेळाडू फिरोउझा अलिझेराविरुद्ध. तसेच त्याच्याविरुद्ध गुकेशचे पारडे जड राहिल असे अंदाज अनेकांचे होते. दरम्यान या फेरीत फिरोउझाविरुद्ध गुकेशने पांढऱ्य़ा मोहऱ्यासह सुरुवात केली. त्याने राजासमोरील प्यादे दोन घरं पुढे सरकवत पहिली चाल खेळली. त्यानंतर तिसऱ्या चालीसाठी त्याने ‘रुय लोपेझ’ ओपनिंगला प्राधान्य दिले.
त्यावर फिराउझाने त्याला चांगले प्रत्युत्तर दिले. त्याने ‘बर्लिन’ बचाव केला. पण यावर गुकेशने ‘कॅसल’ चाल करत आपला राजा सुरक्षित राहिल याची काळजी घेतली. त्याच्याचप्रमाणे फिरोउझानेही ही चाल केली, परंतु त्याने 12 व्या चालीला ‘कॅसल’ केले.
यानंतर फिरोउझा एच-6 प्याद्याची चाल खेळेल, असे वाटत असतानाच त्याने जी-6 प्याद्याची चाल केली. यादरम्यान, दोन्ही युवा खेळाडूंनी वेगवेगळ्या रणनीती वापरून सामन्यात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हळुहळू गुकेशच्या 34 व्या चालीनंतर दोन्ही संघांचे राजे उघडे पडले.
त्यानंतर दोघांनीही 38, 39 आणि 40 व्या चालीला हत्तीचा वापर केला. त्यामुळे हा डाव बरोबरीत संपणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, गुकेशने नवीन रणनीती पुढे ठेवली. त्याने वजीर एच-4 ही चाल केली. त्यामुळे आता या स्पर्धेत गुकेश साडे आठ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यामुळे आता एक अंतिम फेरीत त्याला चांगल्या विजयाची अपेक्षा आहे. त्याचा चौदाव्या फेरीतील सामना उद्या (21 एप्रिल) जागतिक क्रमवारीतील हिकारू नाकामुराशी आहे. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे.





