Pune District : कृषी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना फेलोशिप

नारायणगाव : परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन फेलोशिप 2024-25 अंतर्गत ग्रामोन्नती मंडळ कृषी शिक्षण संकुलातील आठ विद्यार्थ्यांना उपास सोशियो कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून रुपये 35 हजारांची फेलोशिप धनादेशाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचेकडे प्रदान करण्यात आली.
फेलोशिप प्रदान कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, कृषी शिक्षण संकुलाचे प्रमुख रत्नदीप भरवीरकर, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, फाउंडेशन च्या प्रमुख सविता जोहार, प्रकल्प सहाय्यक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थितीत होते. यावेळी कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या माहिती पत्रिकेचेही अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृषिरत्न अनिल तात्या मेहेर म्हणाले, प्राज इंडस्ट्री ही भारतातीलच नव्हे तर जगातील ’ग्रीन एनर्जी आणि अॅग्रीकल्चर एम्पॉवरमेंट’ सेक्टरमध्ये भरीव काम करत आहे.
ग्रामीण भागातील पदविका स्तरावरील विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून पी. पी सी. एफ. फाउंडेशनने नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी शिक्षण संकुलाची निवड केली आहे. याबद्दल फाउंडेशनचे संचालक प्रमोद आणि परिमल चौधरी यांचे ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने आभार मानले.
भविष्यात ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी आपण एकत्रित काम करू. आर्थिक परिस्थितीमुळे कुणाचेही शिक्षण थांबू नये या उद्देशाने फाउंडेशनने आपल्याला मदत केल्याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवावी असे आवाहन केले अशी माहिती कृषी शिक्षण संकुलाचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी दिली. पीपीसीएफ फेलोशिप प्रकल्पाच्या समन्वयक प्रतीक्षा अभंग- भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राध्यापिका राजश्री कवडे यांनी आभार मानले.





