भय ‘करोना’चे; मासांहारविनाच धूळवड

चिकन, मटण मार्केट ओस; 70 टक्क्यांनी विक्री घटली
पिंपरी – दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरी होणारी धूळवड यंदाही शहरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. नागरिक वेगवेगळ्या रंगात रंगून गेले होते. परंतु यावर्षीची धूळवड मासांहाराविनाच साजरी करण्यात अनेकांनी धन्यता मानल्याचे दिसून आले.
दरवर्षी धुळवडीला मोठ्या प्रमाणात चिकन, मटनची विक्री होते. परंतु यंदा करोनाच्या भीतीने नागरिकांनी मांसाहाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. स्थानिक विक्रेत्यांनुसार सुमारे 70 टक्क्यांनी विक्री घसरली आहे.
धुळवडीवर यंदा “करोना’चे सावट दिसून आले. चिकन, मटणावर ताव मारुन दरवर्षी धुळवड साजरी केली जाते. यावर्षी मात्र चिकन खाल्याने करोना व्हायरसची लागण होते, या अफवेने नागरिकांनी चिकन आणि मटन न खाणेच पसंद केल्याचे दिसून आले. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड शहरातील चिकन आणि मटनाची दुकाने पहिल्यांदा धुळवडीच्या दिवशीही ओस पडल्याचे दिसून आले. अंड्याची काही प्रमाणात विक्री झाली, परंतु ती खाण्यासाठी न होता एकमेकांना मारण्यासाठी किंवा रंगाच्या रुपातच झाल्याचे दिसून आले. रस्त्यावर ठिकठिकाणी अंड्यांची टरफले दिसून येत होती.
जगभरात दशहतीचा पर्याय बनलेल्या करोना’ आजाराच्या धास्तीचा परिणाम धुळवड सणावरही पहायला मिळाला. चिकन खाल्यामुळे करोना होत असल्याच्या अफवा सुरुवातीपासूनच पसरल्या आहेत. याबाबत वारंवार स्पष्टीकरण देऊनही लोकांनी भितीपोटी मासांहार करण्याचे टाळले. याचा जबर फटका चिकन, मटन व मांस विक्रेत्यांना आज सहन करावा लागला. चिकन, मांस, मटण यावर ताव मारून धुळवड साजरी करणारे काही दिवसांसाठी शाकाहारी झाले.
गेल्या काही दिवसांपासून चिकन, मटन व्यावसायिकांना करोना’चा फटका बसत आहे. ही तूट धुळवडीला भरुन निघेल, अशी अपेक्षा व्यावसायिकांना होती. परंतु असे झाले नाही. ऐन सुगीच्या दिवसांत लोकांनी पाठ फिरवल्याने चिकन विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी 70 टक्के चिकन खरेदी घटली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
गावरान व ब्रॉयलर या दोन्हीच्या चिकन खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसून येते आहे. हॉटेल व्यवसायिक व चिकन विक्रेते मोजकीच मागणी करत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकसुद्धा अडचणीत सापडले आहेत. दरम्यान करोना’बद्दल गैरसमज पसरविल्यामुळे लोक भीतीपोटी चिकन खरेदी करत नसल्याची खंत चिकन विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. पुणे शहरात मंगळवारी करोनाचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.




