Corona Patients : राज्यात कोरोनाचे ६६ नवीन रुग्ण! मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक धोका

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. राजधानी दिल्ली आणि हरियाणामध्येही कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तथापि, आज ठाण्यातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे आता आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.
राज्यात ६६ रुग्ण पॉझिटिव्ह
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत होत असून तब्बल ६६ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये मुंबई महापालिका हद्दीत ३१, पुणे महापालिका हद्दीत १८, ठाणे महापालिका हद्दीत ७, नवी मुंबई महापालिका हद्दीत ४, पनवेल महापालिका हद्दीत ३, नागपूर महापालिका हद्दीत २, तर सांगलीमध्ये १ रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांना सौम्य स्वरूपाचा कोरोना असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत ४ रुग्णांचा मृत्यू
तर जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात जानेवारी २०२५ पासून एकूण ८,२८२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात पॉझिटिव्ह रुग्ण ४३५ आढळले असून मुंबईमध्ये सर्वाधिक ३१६ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १०६ रुग्ण बरे झाले आहेत. जानेवारी २०२५ पासून कोरोनासह इतर व्याधी असलेल्या ४ रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 1010 वर
ताज्या आकडेवारीनुसार, केरळ (430), महाराष्ट्र (209) आणि दिल्ली (104) मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यासह, गुजरातमध्ये 83, कर्नाटकमध्ये 80 आणि राजस्थानमध्ये 76 सक्रिय प्रकरणे आहेत. 27 मे रोजी, भारतातील कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 1010 वर पोहोचली आहे.





