FDA Raid: पिंपरी-चिंचवडमध्ये FDA चा सर्जिकल स्ट्राईक! २१ लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपींवर थेट ‘मकोका’ लागणार?
FDA Raid: अन्न व औषध प्रशासनाची (FDA) गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई; प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि तस्करीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त.

FDA Raid – अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाने पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान राज्यात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली वाहने आणि इतर साहित्यासह या मुद्देमालाची एकूण किंमत २१ लाख ११ हजार ५२० रुपये आहे. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, एफडीएच्या पथकाला एक गुप्त माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे १९ जून रोजी रात्री सुमारे ९.०० वाजता पथकाने वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील गुरुद्वारा चौकाजवळील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या संशयास्पद वाहनांची सघन तपासणी केली. या तपासणीत राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची एकूण किंमत १२ लाख ३५ हजार ५२० रुपये आहे. याशिवाय, मालाची तस्करी आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
जप्त करण्यात आलेली वाहने आणि मोबाइलची एकूण किंमत ८ लाख ७६ हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण २१ लाख ११ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांच्या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक आरोग्याचा हितासाठी महाराष्ट्र राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि स्वादिष्ट सुपारीच्या उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक व विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य, मोठ्या प्रमाणातील साठा आणि संघटित नेटवर्क लक्षात घेता, एफडीएने संबंधित पोलीस प्रशासनाकडे आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
इंदापूरमध्येही दुकान सील, अडीच लाखांचा माल जप्त
एफडीए पुणेच्या पथकाने इंदापूर परिसरातही एक मोठी कारवाई केली. तेथील एका दुकानातून २ लाख ४१ हजार १४० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधित दुकान सील केले आहे.






