Khadakwasla Canal: अखेर संघर्ष फळाला! खडकवासल्याचे पाणी पोहचले; इंदापूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Khadakwasla Canal: सततची आंदोलने आणि पाठपुराव्यानंतर इंदापूरच्या पश्चिम भागाला दिलासा; पिके वाचवण्यासाठी प्रशासनाकडे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी.

Khadakwasla Canal – मागील अनेक महिन्यांपासून खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. सातत्याने आंदोलने, निवेदने, बैठका आणि प्रशासकीय पातळीवर तीव्र पाठपुरावा केल्यानंतर खडकवासला कालव्यात पाणी सोडण्यात आले असून, यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. पाटबंधारे विभागाच्या दिरंगाईमुळे कालव्यालगतच्या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अधिकाऱ्यांनी अनेक वेळा पाणी सोडण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात पाणी येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना होती. अखेर सततच्या रेट्यानंतर कालव्यात पाणी दाखल झाल्याने आता पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. केवळ पाणी सोडून उपयोग नाही, तर प्रशासनाने पुढील गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत (टेल) पुरेशा दाबाने पाणी पोहोचणे आवश्यक आहे, तरच या आवर्तनाचा खरा लाभ मिळेल.
कालव्याच्या लगत असलेले पाझर तलाव आणि छोटे-मोठे बंधारे या आवर्तनात पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावेत. पाणी उपसा करण्यासाठी आवर्तन काळात वीज पुरवठा खंडित न करता तो सुरळीत ठेवण्यात यावा. कालव्याच्या पाण्याचे वाटप करताना पाईपलाईनची होणारी तोडफोड रोखण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियोजनबद्ध पाणीपुरवठ्याची ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
पिकांना मिळणार नवसंजीवनी
यंदाच्या हंगामात पाण्याअभावी ऊस, भाजीपाला, फळबागा यांसह इतर पिके पूर्णपणे संकटात सापडली होती. पाणी न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी पिके जळण्याच्या व करपण्याच्या स्थितीत पोहोचली होती. हक्काचे पाणी वेळेत मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनाचा मार्गही स्वीकारला होता.





