Water Cut: पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! शहरात आजपासून पाणीकपात लागू; वाचा नवे वेळापत्रक
Water Cut: अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर; पवना धरणातील उपयुक्त साठा घटल्याने पुणे पाटबंधारे विभागाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणीकपातीचे आदेश.

Water Cut – अल निनोचा प्रभाव असल्याने मान्सून लांबला आहे. परिणामी, उष्णता कायम असून धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्याचा फटका आता शहरवासीयांना बसला असून जलसंपदा विभागाने पाणीकपात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पवना धरणामधून पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार असून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा १९ टक्के शिल्लक राहिल्याने आणि यंदाच्या मान्सूनला झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या सूचना पुणे पाटबंधारे विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शहराच्या पाणी पुरवठ्यात शुक्रवारपासून (दि. १९) पासून १५ टक्के कपात केली आहे. पवना धरणामधून यापूर्वी ५५० एमएलडी पाणी सोडण्यात येत होते. त्यामध्ये १५ टक्के कपात केल्याने पवना नदीमध्ये अवघे ४६७ एमएलडी पाणी सोडण्यात येणार आहे.
तसेच आंद्रा धरणामधून इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी चिंचवड शहरासाठी १०० एमएलडी पाणी सोडण्यात येत होते. निघोजे येथील बंधाऱ्यातून हे पाणी उचलून ते शुद्ध करत शहराला पुरवले जात होते. मात्र, त्यामध्ये देखील १५ टक्के कपात केली असल्याने आता ८५ एमएलडी पाणी सोडण्यात येणार आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ३५ लाखांच्या घरात असताना शहराला १५०० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत शहराला अर्धे पाणी मिळत आहे. त्यातही आता कपात करण्यात येणार असल्याने शहरवासियांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
मावळमधील पवना धरणामधून शहरातील ७५ टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे आगामी कालावधीतील पाण्याची उपलब्धता आणि वाढती मागणी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे. शहरातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची आवश्यकता असून पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापौर, आयुक्तांना नाही गांभीर्य
शहरासाठी पाणीकपात हा सर्वात मोठा आणि गंभीर मुद्दा आहे. असे असताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर रवि लांडगे यांनी शहरातील पाण्याचे नियोजन, कपात केल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, आयुक्त किंवा महापौर यापैकी कोणीही याबाबत सविस्तर खुलासा केला नाही. त्यामुळे शहरासाठी महत्वाच्या बाबीवर बोलण्यासाठी आयुक्त, महापौर यांना वेळ नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“धरणामधून १५ टक्के कमी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुरवठा करताना आता पाणी देत असलेल्या वेळेत बदल करत पाणी सोडण्याची वेळ कमी करण्यात येणार आहे. मात्र, ज्या पद्धतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. तो तसास सुरू राहणार आहे. यामध्ये जर ३० टक्के कपात केली असती तर पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याची वेळ आली असती.”
– अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता.






