Ananya Pandey Video : हे शिकण्यासाठी 20 वर्षांची मेहनत..! वडिलांनी घेतली लेकीची बाजू; ‘अनन्या पांडे’ला ट्रोल करणाऱ्यांना दिलं थेट उत्तर
अनन्याचे वडील आणि अभिनेते चंकी पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुलगी अनन्याचे समर्थन करताना लोक या डान्सचा चुकीचा अर्थ लावत असल्याचे म्हटले.

Ananya Pandey : बॉलिवूड अभिनेत्री ‘अनन्या पांडे’ सध्या तिच्या आगामी ‘चांद मेरा दिल’ या चित्रपटातील एका डान्स सीनमुळे चर्चेत आली आहे. चित्रपटातील भरतनाट्यम फ्युजन परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. काही प्रेक्षकांनी या सादरीकरणाचे कौतुक केले, तर अनेक भरतनाट्यम कलाकार आणि नृत्यप्रेमींनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘चांद मेरा दिल’ चित्रपटातील एका दृश्यात अनन्या पांडे पारंपरिक भरतनाट्यमसोबत हिप-हॉप आणि लॉकिंग यांसारख्या आधुनिक डान्स स्टाइल्सचे फ्युजन सादर करताना दिसते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या.
काही प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकारांनी या परफॉर्मन्सवर टीका करताना पारंपरिक नृत्यशैलीचा योग्य सन्मान राखला गेला नसल्याचे मत व्यक्त केले. अनेकांनी भरतनाट्यम मधील भाव, मुद्रा, लय आणि तांत्रिक बारकावे या सादरीकरणात प्रभावीपणे दिसून आले नाहीत, असे म्हटले.
चंकी पांडे यांची प्रतिक्रिया… (Ananya Pandey)
या वादावर आता अनन्याचे वडील आणि अभिनेते चंकी पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुलगी अनन्याचे समर्थन करताना लोक या डान्सचा चुकीचा अर्थ लावत असल्याचे म्हटले.
एका मुलाखतीत बोलताना चंकी पांडे म्हणाले की, “हा परफॉर्मन्स कधीही शुद्ध भरतनाट्यम म्हणून सादर करण्यात आलेला नव्हता. हा एक फ्युजन डान्स होता, जसा कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी सादर करतात.”
Bharatnatyam was founded in 200 BCE and ended with Ananya Pandey in 2026.
😭😭😭 pic.twitter.com/EBPwykGddP— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) May 24, 2026
ते पुढे म्हणाले की, पारंपरिक भरतनाट्यम शिकण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते. हा नृत्यप्रकार अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक आहे. हे शिकण्यासाठी जवळपास 20 वर्षांची मेहनत असते.
मात्र चित्रपटातील सीन हा कथानकाच्या गरजेनुसार आधुनिक आणि पारंपरिक शैलींचा संगम म्हणून तयार करण्यात आला होता. लोकांनी पूर्ण चित्रपट पाहून संदर्भ समजून घेतल्यानंतरच मत बनवावे असे आवाहनही त्यांनी केले.
चित्रपटाची कथा काय?
‘चांद मेरा दिल’ या चित्रपटात अनन्या पांडे ‘चांदनी’ ही भूमिका साकारत आहे. कथेनुसार तिची आई एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असते. चित्रपटाची पार्श्वभूमी इंजिनिअरिंग कॉलेजची असून, तरुणाईचे विचार, कला आणि आधुनिकतेचा संघर्ष यावर कथा आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
याच कथानकाचा भाग म्हणून एका सीनमध्ये चांदनी पारंपरिक भरतनाट्यमऐवजी त्यात आधुनिक डान्स स्टाइल्स मिसळून फ्युजन परफॉर्मन्स सादर करते आणि याच दृश्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला.
अभिनेत्रीचा बॉलिवूड प्रवास…
‘अनन्या पांडे’ ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ती अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी असून तिने स्टुडंट ऑफ द ईयर 2 या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने पति पत्नी और वो, गेहरियां, ड्रीम गर्ल 2 आणि खो गये हम कहाँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
फॅशन, सोशल मीडिया उपस्थिती आणि युवा प्रेक्षकांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे अनन्या नेहमी चर्चेत असते. आता ‘चांद मेरा दिल’मधील या डान्स वादामुळे तिच्या नव्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.






