Tiger shroff : टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; जुन्या घटनेमुळे चिंता वाढली
टायगर श्रॉफवरील गोळीबारामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे, तर दुसरीकडे दिशाच्या कुटुंबाच्या निवासस्थानाबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.

Tiger shroff : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर मुंबईत भरवस्तीत गोळीबार झाल्याच्या घटनेने मनोरंजनविश्वासह पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मुंबईच्या जुहू परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेत टायगर थोडक्यात बचावला; मात्र त्याचा चालक आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाले.
भरवस्तीत, जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडल्याने मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत झाली.
या गोळीबाराचे पडसाद आता मुंबईबाहेरही उमटताना दिसत आहेत. टायगर श्रॉफची जवळची मैत्रीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री दिशा पटानी हिच्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील कुटुंबाच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिशाच्या घराबाहेर यापूर्वीही गोळीबाराची घटना घडली होती.
त्यामुळे टायगरवरील हल्ल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. घराबाहेर तैनात असलेल्या पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेतला आहे. त्यामुळे टायगरवरील हल्ल्यानंतर आता दिशाच्या कुटुंबाच्या सुरक्षेची चर्चा सुरू झाली आहे.
दिशाच्या घराबाहेर यापूर्वीही झाला होता गोळीबार
दिशा पटानीच्या कुटुंबाच्या घराबाहेर गोळीबार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये बरेली येथील तिच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दिशाच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
टायगरला भेटण्यासाठी दिशा पोहोचली घरी?
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर दिशा पटानीने त्याची भेट घेतल्याचं वृत्तही समोर आलं आहे. टायगर आणि दिशा यांच्या मैत्रीबाबत अनेक वर्षांपासून चर्चा होत असते. दोघांनीही आपल्या वैयक्तिक नात्याबाबत सार्वजनिकरीत्या फारशी स्पष्ट भूमिका घेतलेली नसली, तरी त्यांच्यातील जवळीक अनेकदा चर्चेत राहिली आहे.
टायगर श्रॉफवरील गोळीबारामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे, तर दुसरीकडे दिशाच्या कुटुंबाच्या निवासस्थानाबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.









