उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावर भीषण अपघात; रेलिंग तोडून दरीत झाडाला अडकली बस, 26 जण जखमी

उत्तरकाशी – उत्तरकाशीतील गंगोत्री महामार्गावर मंगळवारी रात्री उशिरा बस कठडे तोडून 60 फूट खोल दरीत कोसळली. बस दरीत झाडाला अडकली. या अपघातात तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला. तर 26 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 29 भाविक होते. मृत महिला हल्द्वानी, उधम सिंह नगर आणि नैनिताल येथील रहिवासी आहेत.
जखमींमध्ये बरेली, यूपी येथील 5, बुलंदशहर आणि मेरठमधील प्रत्येकी 1 भाविक आहे. उर्वरित सर्व जखमी उत्तराखंडमधील आहेत. स्थानिक पोलीस, एसडीआरएफ, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन आणि वन विभागाच्या पथकाने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे अनेक गंभीर जखमींना उच्च केंद्रात रेफर करण्यात आले.
या अपघातात दीपा (55, रा. हल्दवानी, उत्तराखंड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन गंभीर महिलांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. यातील एक महिला नीमा कैडा (57) या रुद्रपूर येथील रहिवासी होत्या, तर मीना रॅकवाल या हल्द्वानी येथील रहिवासी होत्या.





