Lok Sabha Election 2024 : निवडणूक रिंगणातून फारूक अब्दुल्ला बाहेर

श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८६ वर्षीय अब्दुल्ला यांनी प्रकृतीचे कारण दिले आहे. त्यांच्या त्या निर्णयाकडे एकप्रकारे राजकीय निवृत्ती म्हणूनच पाहिले जात आहे.
नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) या पक्षाचे अध्यक्ष असणारे अब्दुल्ला सध्या श्रीनगरचे खासदार आहेत.
आता त्यांच्या जागी एनसी कोणाला मैदानात उतरवणार याविषयी उत्सुकता असेल. अब्दुल्ला यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री उमर यांनी याआधीच आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तेही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मानले जाते. अब्दुल्ला यांनी २००२ यावर्षी केंद्रातील राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.
त्यावर्षी विधानसभा निवडणुकीतील एनसीची सुत्रे उमर यांच्याकडे सोपवण्यात आली. आता पक्षाची संपूर्ण जबाबदारी पुढील काळात उमर यांच्या खांद्यांवर असेल. ते सध्या एनसीचे उपाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणूक ही उमर यांच्या नेतृत्वाची पहिली परीक्षा ठरेल. निवडणुकीत प्रचाराची मुख्य धुराही त्यांनाच सांभाळावी लागेल.





