अग्रलेख : चहुबाजूने कोंडी
चौफेर टीकेचे धनी झालेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांचा पाय दिवसेंदिवस आणखीनच खोलात जाताना दिसतो आहे.

Gyanesh Kumar : चौफेर टीकेचे धनी झालेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांचा पाय दिवसेंदिवस आणखीनच खोलात जाताना दिसतो आहे. त्यांनी केलेला खोटारडेपणा सातत्याने उघडकीला येत आहे, आता तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीतही साफ खोटारडेपणा केल्याचे काल झालेल्या सुनावणीच्या वेळी उघडकीला आले आहे.
फॉर्म नंबर 6 मध्ये आपण जे बदल केले ते बदल सर्वोच्च न्यायालयानेच वैध ठरवले आहेत, असे जाहीर प्रतिपादन ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी 26 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या एका प्रेस नोटमध्ये केले होते. पण काल सर्वोच्च न्यायालयात या अनुषंगाने दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीच तोंडी असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे की, आम्ही निवडणूक आयोगाला फॉर्म 6 मध्ये करण्यात आलेल्या कोणत्याही बदलाला संमती दिलेली नाही. आता याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना नोटीस बजावून सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडूनच थेट उत्तर मागवले आहे.
सध्याच्या एसआयआर प्रक्रियेतील वादाच्या संदर्भात फॉर्म नंबर 6 मध्ये करण्यात आलेले बदल हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. फॉर्म नंबर 6 मध्ये संसदेच्या संमतीशिवाय निवडणूक आयोग परस्पर कोणताही बदल करू शकत नाही. याच अनुषंगाने तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी माहितीच्या अधिकारात केंद्र सरकारला हा प्रश्न विचारला होता.
फॉर्म नंबर 6 मध्ये केंद्र सरकारनेच काही बदल सुचवले आहेत काय, असे त्यांनी या अर्जात विचारले होते. त्याला उत्तर देताना केंद्र सरकारनेही आपले हात झटकले असून आम्ही यात कोणताही बदल सुचवलेला नव्हता असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार चारही बाजूने कात्रीत सापडले आहेत. केंद्रातील सत्ताधार्यांना अनुकूल असे निर्णय ज्ञानेश कुमार यांनी यापूर्वीच्या काळात घेतले आणि नियमबाह्यपणे त्यांनी निवडणूक प्रक्रिया राबवली.
एसआयआर प्रक्रियेत असंख्य घोळ केले, कोट्यवधी पात्र मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले, असे सगळे आरोप गेले अनेक दिवस सुरू आहेत. आता या आरोपांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी देशातील सगळेच विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत, त्यामुळे ज्ञानेश कुमार यांचा यापुढचा काळ अत्यंत कसोटी पाहणारा ठरणार आहे.
ज्ञानेश कुमार कशा गैरपद्धतीने देशातील निवडणूक प्रक्रिया राबवत आहेत याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी गेली तीन वर्षे सातत्याने पुराव्यासह आरोप करीत आहेत, पण हे आरोप तद्दन राजकीय स्वरूपाचे आहेत असे नमूद करीत त्यांचे आरोप मोडीत काढले गेले. पण जेव्हा निवडणूक आयोगातीलच अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या सुमारे आठ ते दहा महिन्यांत 14 वेळा ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून हे गैरव्यवहार आम्हाला मान्य नसल्याचे नमूद केले आहे.
या 14 पत्रातील तपशील पाहता राहुल गांधी आणि अन्यविरोधी पक्षांकडून सातत्याने केले जात असलेले आरोप खरे ठरले आहेत, म्हणूनच आता सगळे विरोधक एकत्रितपणे त्यांच्या विरोधातील निर्णायक लढण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त हे पद घटनात्मक पद असल्याने त्यांना असे तडकाफडकी पदावरून दूर करता येणार नाही वगैरे कितीही दाखले दिले जात असले तरी देशाचा एकूणच मूड ज्ञानेश कुमार यांना एक दिवसही त्या पदावर सहन करण्याचा नाही. त्यामुळे स्वतःची आणखी फटफजिती करून न घेता ज्ञानेश कुमार यांनी स्वतःहून पायउतार होणे हाच या सगळ्या पेचप्रसंगाला एकमेव उपाय म्हणता येईल.
ज्ञानेश कुमार यांच्यावर मोदी, शहा यांचा पूर्ण दबाव किंवा नियंत्रण आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे थेट मोदी आणि शहा यांचीही इभ्रत दिवसेंदिवस धुळीला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात निवडणुकांमध्ये जे सातत्याने घवघवीत यश मिळवले आहे, ते पूर्णपणे काळवंडले जात आहे. देशातील विद्यमान आणि माजी न्यायाधीश तसेच काही माजी निवडणूक आयुक्त असे सगळेच जण आता ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविषयी बोलू लागले आहेत.
महाराष्ट्रात चोकलिंगम नावाचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत, त्यांनीही याबाबत उघडपणे आपली काही मते व्यक्त केली आहेत. मतदार यादीतील नावे वगळण्याचे किंवा नवीन नावे जोडण्याचे जे सॉफ्टवेअर कार्यरत आहे त्यावर केवळ केंद्रीय निवडणूक आयोगाचा एकतर्फी अधिकार असल्याने त्यात एकतर्फी मनमानी केली जाते.
स्थानिक पातळीवर नागरिकांची कितीही योग्य केस समोर आली तरी त्यांना न्याय द्यायला स्थानिक पातळीवरचे निवडणूक निर्णय अधिकारी सपशेल अपयशी ठरत आहेत हा मुद्दा गोव्यातील एका प्रकरणावरून जगजाहीर झाला आहे. आणि त्यावरूनही न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगावर अत्यंत कडक भाषेत ताशेरे मारले आहेत.
इतकी सगळी बेअब्रू होऊनसुद्धा ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) आपल्या खुर्चीला चिटकूनच राहणार असतील तर त्यांची जबरदस्तीने उचल बांगडी करण्याखेरीज पर्याय उरत नाही. त्यांच्या विरोधातला असंतोष हा थेट मोदी आणि शहा यांच्या विरोधातला असंतोष असून त्याला ज्ञानेश कुमार हेच मुख्य कारणीभूत ठरले असल्याने त्यांचा शक्य तितक्या लवकर निकाल लागणे देशाच्या एकूणच लोकशाहीच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरला आहे.






