Farm laws repeal: शेतकरी एकजूट आणि कॉंग्रेसच्या आंदोलनाचा विजय – विश्वजित कदम

पुणे – देशातील शेतकऱ्यांवर लादलेले तीनही अन्यायकारक कृषी कायदे केंद्र सरकारला अखेर मागे घ्यावे लागले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांसह कॉंग्रेस पक्षाने उभारलेल्या या ऐतिहासिक लढ्याचा हा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कृषी आंदोलनाच्या प्रत्यक्ष युद्धभूमीत आघाडीवर राहून आंदोलन केले. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र प्रतिकार केला. या जुलमी कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने केली. सांगली जिल्ह्यामध्ये देखील भव्य ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करून कृषी कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्यात आली. कृषी कायदे रद्द केल्याने आंदोलकांनी देशातील कृषी क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे.
देशभरातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि धाडसाचा हा मोठा विजय आहे. या लढ्यामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांनादेखील भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. यापुढील काळात देखील कॉंग्रेस पक्ष आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने देशाला महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकटात लोटले आहे. केंद्र सरकार जनहिताच्या विरोधात निर्णय घेत आहेत. आगामी काळात देशभरातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही कदम यांनी म्हटले.





