कृषी क्षेत्रात अन्नधान्याचा साठा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे: मंत्री जयकुमार रावल
Updated On:

Jayakumar Rawal Pune : नुकतीच राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुण्यात पणन कृषी कार्यालयात विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. यानंतर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ संचालक मंडळाच्या बैठक रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत त्यांनी वखार महामंडळाच्या गोदामामध्ये धान्य ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास आणि इच्छा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच धान्य गोदामांमध्ये आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सूचना केल्या आहेत.
राज्यात वखार महामंडळाचे १७.२ लाख मेट्रिक टन क्षमतेने स्व मालकाची साठवणूक क्षमता असलेले गोदामे आहेत. तसेच भाडेतत्वावरील ७.२२ लाख मेट्रिक टन असे २४ लाख मेट्रिक टन आहे. त्यामध्ये सुमारे ५२ हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे गोदाम निर्मितीसंदर्भात व्यवहार्याचे नियोजन करावे, राज्यातील गोदामांचे रेटिंग करून घ्यावे जेणेकरून केंद्र सरकारच्या सवलतींचा लाभ घेता येईल, अशा सूचना मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या साठवणूक भाड्यामध्ये ५० टक्के आणि शेतकरी उत्पादक संस्थांना २५ टक्के सवलत दिली जाते. साठवणूक केलेल्या मालास १०० टक्के विमा सरंक्षण तसेच शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. धान्य साठवणूकीमुळे बाजारभाव उच्च उसताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला परतावा मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. तसेच शेतकऱ्यांचा शेतीमाल शास्त्रशुद्ध पद्धतीने साठविण्यासोबतच कृषी क्षेत्रात अन्नधान्याचा साठा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.
पारदर्शकता राहण्यासाठी सीसीटीव्ही बसवावेत
राज्यात असेलल्या धान्य गोदामामध्ये सनियंत्रण टिकून राहण्यासाठी आणि कामकाजात पारदर्शकात राहण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे नियंत्रण कक्ष पुणे येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात करावे. यामुळे राज्यातील गोदामात उपलब्ध धान्य साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक साठवणूक क्षमता वाढ होण्यास मदत होईल, असे देखील रावल यांनी स्पष्ट केले. या बैठकीला महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे यांच्या अधिकारी उपस्थित होते.





